नळदुर्ग :- नगरपालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते तथा नगरसेवक निरंजन राठोड यांनी उपनगराध्यक्ष निवडणुक संहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात राष्ट्रवादीचेच नगरसेवक उदय जगदाळे यांनी केलेल्या तक्रारीवरून नगर विकास खात्याकडून कक्ष अधिकारी प्रवीण पाटील यांनी उस्मानाबाद जिल्हाधिकाऱ्यांना तात्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश दि. 24 ऑगस्ट रोजी पत्राद्वारे दिले आहे.
नगरसेवक उदय जगदाळे यांनी केलेल्या तक्रारीमध्ये नळदुर्ग नगरपालिकेतील उपाध्यक्ष निवडीसाठी बोलावण्यात आलेल्या विशेष सर्वसाधारण सभेमध्ये अर्ज मागे घेण्याच्या कालावधीमध्ये नगरसेवक निरंजन राठोड यांनी निर्धारित वेळेत सदर विषय सभेमध्ये भाषण, आवाहन, आदेश, पक्षादेश काढण्याची तरतूद नसतानाही मतदारावर प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या प्रभाव पाडण्यासाठी व गटनेता नसतानाही तथाकथित पक्षादेशाचे वाचन व भाषण सभागृहात केले. तसेच नगराध्यक्ष तथा पीठासीन अधिकारी यांनी निरंजन राठोड यांच्याशी संगनमत करून शाहीन मासुलदार या उपाध्यक्षपदी निवडून याव्यात म्हणून हे गैरकृत्य केले. यामुळे या विशेष सभेत कुठलाही अधिकार नसताना निरंजन राठोड यांनी पक्षादेश काढून वाचला व भाषण केले यामुळे मतदारांवर प्रभाव पाडण्यासाठी हे गैरकृत्य केल्याचा आरोप उदय जगदाळे यांनी केला असून यापुढे राठोड नगरसेवकपदी राहणे योग्य ठरणार नाही त्यांना पदच्युत करावे अशी मागणी राष्ट्रवादीचे नगरसेवक उदय जगदाळे यांनी नगरविकास खात्याकडे केली होती. यावरून नगरविकास खात्याचे सचिवांनी उस्मानाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने याबाबतचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
