उस्मानाबाद :- उस्मानाबाद जिल्हृयाचे अर्थकारण शेती केंद्रीत असून सततच्या दुष्काळामुळे शेती व्यवसाय अडचणीत आहे, जिल्ह्यात इतरत्र रोजगाराच्या कमी संधी उपलब्ध असल्यामुळे युवकांनी या प्रशिक्षणाचा लाभ घेऊन रोजगार उपलब्ध करुन घ्यावे, असे आवाहन उस्मानाबाद येथे आयोजित रोजगार प्रशिक्षण मेळाव्यात आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी आज केले. युवकांना प्रशिक्षण देऊन नौकरी उपलब्ध करुन दिल्याशिवाय संबंधित प्रशिक्षण संस्थेला प्रशिक्षणाचा खर्च मिळणार नसल्यामुळे प्रशिक्षणार्थीं नौकरीपासून वंचित राहणार नाहीत. जास्तीत जास्त युवकांनी यामध्ये सहभाग नोंदवून प्रशिक्षितीत व्हावे, यामुळे त्यांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. 
      जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, उस्मानाबाद पंचायत समितीच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान व दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनेंतर्गत जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात बुधवार दि. 8 ऑगस्ट 2018 रोजी रोजगार मेळावा जिल्हा परिषद अध्यक्ष नेताजी पाटील यांच्या अध्यक्षस्थानी घेण्यात आला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आमदार राणाजगजितसिंह पाटील उपस्थित होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.संजय कोलते, जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा सौ. अर्चनाताई पाटील, पंचायत समिती सभापती बालाजी गावडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, गट विकास अधिकारी विजयसिंह नलावडे, जिल्हा अभियान व्यवस्थापक डॉ.बलवीर मुंढे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
     यावेळी पुढे बोलताना आमदार श्री.पाटील म्हणाले की, उस्मानाबाद जिल्ह्यात सतत दुष्काळ असल्याने जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जास्तीत जास्त युवक युवतींनी रोजगार मेळाव्यात नोंदणी करुन सहभाग घ्यावा, या प्रशिक्षणाकरिता इयत्ता 10 वी पास व नापास ते पदवीधर निर्धारित केले असून रिटेल, आयटी, बीपीओ, हाऊस किपींग, या सेवा क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या उमेदवारांना या प्रशिक्षणासाठी संधी उपलब्ध होणार आहे. प्रशिक्षणार्थींना राहण्याची व जेवनाची सोय व शंभर टक्के नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. या वर्षी जिल्ह्यासाठी 790 युवक युवतींना प्रशिक्षणाचे लक्षांक देण्यात आले असून हे लक्षांक वाढविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ही आमदार श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.
      यात पात्र लाभार्थ्यांची निवड करून त्यांना मोफत रोजगार प्रशिक्षण दिले जाणार असून प्रशिक्षणासाठी दारिद्रय्‍रेषाखालील व स्वयंसहाय्यता गटातील युवक युवतींना प्रशिक्षणासाठी प्राधान्याने सामावून घेण्यात येणार आहे, असे प्रास्ताविकात तालुका अभियान व्यवस्थापक पूजा घोगरे यांनी सांगितले.

 
Top