बार्शी (गणेश गोडसे) :-
शासकीय, निमशासकीय कर्मचा-यांनी विविध मागण्यांसाठी सुरू केलेल्या संपामुळे बार्शी शहरातील कामकाज मंगळवार पासुन सुरू केलेल्या आंदोलनामुळे सरकारी कामकाज ठप्प झाले आहे. बंद मध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षकांनी सहभाग घेतल्यामुळे शाळांना सुट्टी असल्यामुळे शाळा ओस पडल्याचे दिसत होते. शासकीय कामे घेऊन ग्रामीण भागातील अनेक जण शहरात आलेले होते. मात्र कार्यालयात कोणीच नसल्याने त्यांना मोकळ्या हाताने परतावे लागले.
निवृत्तीसाठीचे वय ६० वर्ष करावे, सातवा वेतन आयोग, अनुकंपा धोरनानुसार भरती प्रक्रिया राबवावी,तसेच सात दिवसाऐवजी पाच दिवसांचा आठवडा करावा, आदी वेगवेगळ्या मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य शासकीय कर्मचा-र्यांच्या संघटनांनी 7 ऑगस्ट पासुन 9 ऑगस्ट पर्यंत सलग तीन दिवस संप सुरू केला आहे. संपात सरकारी , निमसरकारी कर्मचारी सहभागी झाल्यामुळे सरकारी यंत्रणा कोलमडुन पडली आहे. प्रलंबित मागण्यासंदर्भात सरकार उदासिन असल्याचा कर्मचा-यांचा आरोप आहे. पंचायत समिती, जिल्हा, परिषद बांधकाम, प्रांत कार्यालय, प्राथमिक शिक्षण विभाग, महसूल विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, भूमि अभिलेख विभाग, जि.प. पाणी पुरवठा विभाग, तालुका ग्रामसेवक कर्मचारी संघटना, कृषि विभाग आदी विभागातील कर्मचारी सातवा वेतन आयोग मिळावा, व अन्य प्रलंबित मागण्यासाठी संपावर गेल्याने कार्यालयातील कामकाज ठप्प होते.