नळदुर्ग :- नगरपरिषदेची शहरात विकासकामे करण्यात उदासिनता असल्याने तसेच निष्क्रिय कारभारामुळे दोन वर्षात शहर विकासापासून कोसो दूर गेले आहे. अशा प्रकारच्या निष्क्रिय कारभार करणा-या नगरपरिषदेच्या पदाधिका-यांना शासनाने अपात्र ठरवून नगरपरिषदेवर प्रशासकाची नियुक्ती करावी, अशी मागणी होत आहे. नगरपरिषदेच्या या कारभारामुळे शासनाकडून नगरपरिषदेला प्राप्त झालेल्या निधीपैकी तब्बल एक कोटीपेक्षा जास्त निधी शासनाला परत देण्याची नामुष्की नगरपरिषद प्रशासनावर ओढावली आहे.

नगरपरिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असून राष्ट्रवादीच्या नगराध्यक्षाबरोबरच 17 पैकी 12 नगरसेवक राष्ट्रवादीचे आहेत. शहरवासियांनी पूर्ण बहुमताने नगरपरिषदेची सत्ता राष्ट्रवादीच्या ताब्यात दिली. मात्र 2 वर्षात सत्तेत असणा-या राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी शहर विकासाचा खेळखंडोबा करुन ठेवला आहे. आज बहुमताने नगरपरिषदेमध्ये सत्तेत असणारी राष्टव्रादी आता अल्पमतात येण्याचा धोका निर्माण झाला आहे. राष्ट्रवादीच्या चार नगरसेवकांनी पक्ष नेतृत्वाच्या विरोधात उघडपणे बंद पुकारले आहे. हे राष्ट्रवादीसाठी धोकादायक असून निदान नळदुर्ग शहरात तरी केवळी राष्ट्रवादीचे नेतृत्व मजबूत नसल्यामुळे आज राष्ट्रवादीच्या आपआपसातील भांडणातील शहरातून राष्ट्रवादी पक्ष नामशेष होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सध्या नळदुर्ग नगरपरिषदेमध्ये राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी अक्षरश: तमाशा मांडला आहे. 

शहरवासियांनी मोठया अपेक्षेने राष्ट्रवादीला निवडणुकीत पूर्ण बहुमताने नगरपरिषदेची सत्ता दिली. मात्र आज शहरवासियांना त्याचा मोठा पश्चात्ताप झाल्याचे दिसून येत आहे. कारण राष्ट्रवादीचे नेते अशोक जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली नगरपरिषदेमध्ये पक्षाची सत्ता येवून दोन वर्षे होत आली आहेत. मात्र या कालावधीत नगरपरिषदेच्या तिजोरीत कोटयावधी रूपयांचा निधी शिल्लक असतानाही सत्तेत असणा-या राष्ट्रवादीकडून शहरात विकासाचे एकही काम झाले नाही. आज शहरातील काही मुख्य रस्त्यांची अवस्था इतकी वाईट झाली आहे की, त्या रस्त्यावरुन नागरिकांना व्यवस्थित चालताही येत नाही. मराठा गल्ली ते पांचपीर चौकमार्गे किल्ला गेट या रस्त्यावर इतके खड्डे पडले आहेत की खड्डयात रस्ताच सापडत नाही. मराठा गल्ली येथिल नागरीक एका वर्षापासून हा रस्ता दुरुस्त करण्याची मागणी नगरपरिषदेकडे करत आहेत. मात्र आजपर्यंत नगरपरिषदेने या रस्त्याचे काम केले नाही. ही दुर्देवाची बाब आहे. शहरातील अनेक रस्त्याची अवस्था अशीच आहे. न.प. च्या तिजोरीत पैसे असतानाही या रस्त्याची कामे करण्यात आली नाहीत. तसेच सुमारे एक कोटीचा निधी परत शासनाकडे पाठविण्याची नामुष्की नगरपरिषदेवर ओढवली आहे.
राष्ट्रवादीची ही अवस्था शहरात पक्षाचे नेतृत्व नसल्यामुळे झाली आहे. अशोक जगदाळे हे राष्ट्रवादीचे नेते आहेत. मात्र त्यांच्याच पक्षाचे काही नगरसेवक त्यांना नेता मानण्यास तयार नाहीत आणि नेमक्या याच कारणामुळे शहराचा विकास रखडला आहे. यामध्ये लवकर सुधारणा होवून शहरात विकास कामे होणे गरजेचे आहे. अन्यथा राष्ट्रवादीला नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागणार आहे.

पूर्व प्रसिध्दी - दै. सामना
- विलास येडगे, नळदुर्ग
 
Top