वास्तव हे कटू असले तरी ते सत्य वर्तविणारं असतं हे काही खोटे नाही. एकविसाव्या शतकात एक पाऊल पुढे असल्याची वल्गना करणाऱ्या डिजिटल इंडियात आजही अक्षरांची तोंड ओळख नसलेल्या आणि शाळा म्हणजे काय..? असा आक्रोश करणार्या मुक्या जिवाची आर्त हाक कोणत्याही संवेदनशील माणसाला अस्वस्थ करणारी आहे.
स्वातंत्र्याच्या 71 वर्षात शिक्षण हक्क कायद्याची अनिवार्यता निर्माण झाली. राजकारण, अर्थकारण, व उद्योगधंदा याबरोबरच देश महासत्ता होण्याच्या प्रयत्नाकडे झुकला गेला. महिला सक्षमीकरणाला व बालकल्याणाच्या विविध योजना जन्मास आल्या. मात्र दुसरीकडे अन्न ,वस्त्र व निवारा नसलेल्या गावकुसाबाहेरील मरगम्मा कोळी समाजाच्या शेकडो लेकरांनी अद्याप आपली कुस बदलली नसल्याचं भेदक वास्तव नाकारता येत नाही.
तुळजापूर तालुक्यातील नळद्रुर्ग या राष्ट्रीय महामार्गावरील ऐतिहासिक शहरालगत गेल्या अनेक वर्षापासून वास्तव करणाऱ्या मरगम्मा कोळी समाजाच्या संघर्षाची कहाणी अशीच थक्क करणारी आहे .छोटी मोठी खेळणी विकून उदरनिर्वाह भागविणारी आठ ते दहा घरांची ही पालावरची वस्ती...! पाठीशी बांधलेलं अठराविश्व दारिद्र्य घेऊन जगणाऱ्या अशिक्षित व अस्तित्वहीन अशा या कुटुंबातील चुणचुणीत मुलं आजही शिक्षणापासून वंचित आहेत. सुदृढ बाळे बलवान देश म्हणणाऱ्या व्यवस्थेचे ते प्रतिनिधी होऊ शकतात का..? सर्व सोयी सुविधांपासून दूर फाटक्या लक्तरातील पालीत खुणावणारं हरवलेलं बालपण..हे विदारक भयान पाहिल्यावर मन उद्विग्न होतं .वयाची पंधरा वर्षे पूर्ण झाली मात्र पाटी-पेन्सिल आणि अक्षरांची ओळख नसलेला या पालात राहणारा अक्षय हा मात्र शिक्षणापासून कोसो दूर लांब आहे.. हे सारं भयाण वास्तव पाहिल्यानंतर असं वाटतं आकाशी झेप घेण्याचं अंगी सामर्थ्य असतानाही ज्यांचे जन्म मातीत मळले अशा उपेक्षितांचा तो प्रतिनिधी आहे
अशा वंचित-उपेक्षित मुलांच्या मूळ गरजा ओळखून त्या पूर्ण करणे ,शिक्षण ,आरोग्य याकडे लक्ष देण्यातच खरी स्वातंत्र्याची सार्थकता आहे. स्वातंत्र्याच्या 71 वर्षानंतरही आई-वडिलांच्या प्रेमापासून वंचित राहिलेल्या आणि भुकेने व्याकूळ झालेल्या मुलांच्या भविष्यावर अंधाराचं सावट पसरलेले आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी रेल्वे स्टेशन, बस स्थानक अनेक ठिकाणी भटकंती करणाऱ्या मुलांच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे 24.6 कोटी मुले बालकामगार म्हणून काम करतात आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या अहवालानुसार मुले आजही बालकामगार म्हणून काम करत असल्याचं दिसून येत आहे. हे धक्कादायक वास्तव आहे .शासकीय योजनांपासून दूर अशा अनाथ निराधार , या ना त्या कारणाने समाजाने बहिष्कृत केलेल्या हजारो जखमी पिलांना कवेत घेण्याची आज गरज आहे. बालगुन्हेगारी यासारख्या मुलांच्या जीवनातील भय चिंता ,ही गंभीर बाब आहे .कुपोषणाचे बालकामगारांचे जीवन जगणारे हजारो मुले जगण्यासाठी संघर्ष करत आहेत. हे मानवी हक्क आयोगाच्या अहवालात स्पष्ट झाले आहे .तेव्हा पुन्हा एकदा शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणि उत्तम आरोग्यासाठी सुंदर जीवन त्यांना जगता यावं यासाठी सर्व स्तरातून प्रयत्न होण्याची गरज निर्माण झाली आहे
- भैरवनाथ कानडे
चिकुंद्रा, ता. तुळजापूर