लोहारा (इकबाल मुल्ला) :-
राज्य शासन मृद व जलसंधारण विभाग आणि भारतीय जैन संघटना यांच्यात मृद व जलसंधारणाच्या कामांसाठी करार झाला असून या अनुषंगाने महाराष्ट्रातील ५ जिल्ह्यात जलयुक्तची मोठी कामे हाती घेतली जाणार आहेत. यात उस्मानाबाद जिल्ह्याचाही समावेश आहे. 
  सदर योजनेअंतर्गत दिनांक ११ ते १४ ऑगस्ट दरम्यान प्रत्येक गावात शिवारफेरी आयोजित करून गावातील आवश्यक असलेले सर्व जलसंधारणाच्या कामाची  (उदा.नाला सरळीकरण / खोलीकरण, तलावातील गाळ काढणे, बांधबंधिस्तीची कामे, शेततळी बनवणे, गावतलाव बनवणे, आदी कामे) यादी तयार करून  दि १५ ऑगस्टच्या ग्रामसभेत सदर यादीस मान्यता घेऊन याचा ठराव सदर समितीचे सचिव, तथा उपअभियंता स्थानिक स्तर. विभाग, उमरगा यांच्यामार्फत मा.अध्यक्ष, तथा उपविभागीय अधीकारी, उमरगा यांच्याकडे दाखल करावेत.
याकामी गावातील परंपरागत पाण्याचे स्रोत जुने ओढे, तलाव, नाले याचा शोध घेऊन प्रत्येक सरपंचांनी त्यांच्या कामाचे गावपातळीवर नियोजन करून त्याची योग्य मांडणी करून वरिष्ठ पातळीवर ठरावाद्वारे मागणी केल्यास त्या त्या गाव व परिसरातील जलसंधारणाची जास्तीत जास्त कामे पूर्ण करून घेता येतील. 
सदर योजनेचा पूर्ण आराखडा तयार झाल्यानंतर भारतीय जैन संघटनेद्वारे आवश्यक तेवढ्या सर्व मशिनरी पुरवठा केला जाणार असून त्यासाठी लागणारे इंधन हे शासनामार्फत पुरविले जाणार आहे.
तरी या योजनेचा लाभ घेणे करिता उमरगा व लोहारा तालुक्यातील सर्व गावांचे सरपंच व इतर लोककप्रतिनिधी, शेतकरी यांनी दि.14 /08  पर्यंत कृती आराखडा तयार करावा ,व 15 ऑगस्ट रोजी ग्रामसभेत ठराव घेऊन सदर प्रस्ताव उप अभियंता स्थानिक स्तर विभाग यांच्याकडे सादर करण्याचे आवाहन उमरगा-लोहारा तालुक्याचे आमदार ज्ञानराज चौगुले यांनी केले आहे. सदर योजनेचा लाभ नगरपालिका कार्य क्षेत्रात ही घेतला जाऊ शकतो.
 
Top