एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला उस्मानाबाद लोकसभा मतदार संघात मागील 20 वर्षात राष्ट्रीय पक्ष असलेल्या काँग्रेसची पिछेहाट झाली. तर दुसरा राष्ट्रीय पक्ष असलेल्या भाजपच्या खात्यात आजतगायत काहीही जमा नाही. याचे मुख्य कारण म्हणजे युती आणि आघाडीच्या घ्याव्या लागलेल्या कुबडया... मात्र यावेळी कुबडयाविना (युती-आघाडी) निवडणुका होण्याची सध्यातरी शक्यता असून काँग्रेससाठी उमेदवार निवड तर भाजपसाठी नव्याने तयारी करावी लागणार आहे. जिल्हयात सर्वाधिक ताकद असलेल्या राष्ट्रवादीकडे उमेदवार निश्चित असला तरी सेनेकडे मात्र इच्छुकांचा फौजफाटा मोठया संख्येने तयार आहे. राष्ट्रीय पक्ष असलेल्या काँग्रेस व भाजपने उस्मानाबाद लोकसभेचे रणशिंग फुंकले असून केंद्रातील सत्ताधा-यानी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्रित घेण्याचे संकेत दिले आहे.
उस्मानाबाद लोकसभेचा इतिहास :-
पायी व बसने प्रवास करणारे व नळदुर्गचे सुपुत्र असलेले व्यंकटराव नळदुर्गकर (सन 1957-1962) यांच्यानंतर काँग्रेसकडूनच टी.ए. पाटील (सन 1967 ते 1977) सलग तीन वेळेस खासदार होते. त्यानंतर टी.एस. श्रंगारे (सन 1977-1980), टी.एन. सावंत (1980-84), त्यानंतर आरक्षित झालेल्या जागेवर काँग्रेसचे अरविंद कांबळे (सन 1984 ते 1996) हे सलग तीन वेळेस खासदार म्हणून निवडून आले. यानंतर शिवसेनेचे शिवाजी कांबळे (सन 1996-98), पुन्हा कॉंग्रेसचे अरविंद कांबळे (1998-99) हे निवडून आले. सन 1999-2004 या कालावधीत शिवसेनेचे शिवाजी कांबळे दुस-यांदा खासदारपदी विराजमान झाले. त्यांनतर सेनेच्याच कल्पना नरहिरे (सन 2004-2009) हया निवडून आल्या. यानंतर हा मतदार संघ सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुला झाला. यावेळी हा मतदार संघ आघाडीतून राष्ट्रवादीच्या वाटयाला आला व पदमसिंह पाटील हे सन 2009 साली राष्ट्रवादीकडून पहिले खासदार झाले. मात्र या निवडणुकीत शिवसेना (युती) उमेदवार प्रा. रविंद्र गायकवाड यांचा 6 हजार 787 मतांनी निसटता पराभव झाला. यानंतर देशभर मोदी लाट असताना शिवसेनेचे (युती) प्रा. रविंद्र गायकवाड हे रेकॉर्डब्रेक मताधिक्य घेवून 2 लाख 34 हजार 325 एवढया मतानी विजयी झाले.
एकंदरीत उस्मानाबाद लोकसभेसाठी निवडून आलेल्या 15 खासदारापैकी काँग्रेस (आय) चे 10, शिवसेनेचे 4 तर त्या खालोखाल राष्ट्रवादीचा खासदार एकदा निवडून आला आहे.
2019 ची स्थिती काय असेल?....
लोकसभा निवडणुक तोंडावर आली असून लाट ओसरूनसुद्धा मोदींची क्रेझ म्हणावी तितकी कमी झाली नाही, याचे कारण म्हणजे विरोधी चेहरा मोदीच्या तोडीचा नाही, याची सर्वत्र चर्चा आहे. लोकसभेचा विचार करता केंद्रात सत्तेवर कोण आसावे? पंतप्रधान कोण आसावा? हेच मुद्दे निर्णायक ठरत आले आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीला सत्तेशिवाय पर्याय नसल्यामुळे आघाडीची शक्यता आहे. याउलट सेना-भाजपची युती मात्र फिसकटण्याची शक्यता सध्या तरी दिसत आहे.
उस्मानाबाद लोकसभा निवडणूकीचा विचार करता (युती आघाडी नाही झाल्यास) काँग्रेस आणि भाजप या राष्ट्रीय पक्षासाठी ही निवडणूक निर्णायक ठरणार आहे. त्याचे कारण या दोन्ही पक्षांनी यापुर्वीच्या दोन्ही निवडणूकीत स्वतःचे उमेदवार न देता मिञ पक्षास मदत (?) केली होती. यामुळे या दोन्ही पक्षासाठी उमेदवार निवडणे व इतर डावपेच आखणे आव्हान ठरणार आहे. या उलट राष्ट्रवादी व शिवसेना हे उस्मानाबाद लोकसभेचे मागील काही वर्षातील पारंपरिक प्रतिस्पर्धी ठरले आहेत. २०१४ नंतर तेरणेच्या पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. लाट सूद्धा आता राहिली नाही. तो निकाल आता भुतकाळ झाला असून आता नवे समिकरण पुढे येत आहेत.
दोन सिंह, चार वाघ, हात घेतोय नुसता माग..
हे वाचूया पुढील बातमी पत्रात....