तुळजापूर :
येथील झुंजार हनुमान मंदिरात दि. 27 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर या कालावधीत श्री कृष्ण जन्माष्टमी निमित्त ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताह आणि दहिहंडी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दहिहंडी स्पर्धेत प्रथम पारितोषिक 11 हजार रुपये संयोजकानी ठेवले आहे.
दि. 27 ऑगस्ट ते दि. 3 सप्टेंबर कालावधीत होणारे दैनंदिन कार्यक्रम पुढीलप्रमाणे - दररोज सकाळी 4 ते 6 वाजेपर्यंत काकडा आरती होणार असून सकाळी 7 ते 11 श्री ज्ञानेश्वरी पारायण, सकाळी 11 ते 1 गाथाभजन, दुपारी 1 ते 3 विश्रांती भोजन, दुपारी 4 ते 5 प्रवर्चन, 5 ते 6 हरिपाठ, रात्री 7 ते 9 भोजन, रात्री 9 ते 11 किर्तन, रात्री 11 ते 1 भारुड भक्तीगीत व हरिजागर होणार आहे. त्याचबरोबर दि. 27 ऑगस्ट रोजी ह.भ.प. नारायण महाराज उब्रंज (नांदेड) यांचे किर्तन, दि. 28 रोजी ह.भ.प. सोपान महाराज आळंदी (देवाची), दि. 29 रोजी ह.भ.प. विजय बाळ सराफ महाराज जुन्नर, दि. 30 रोजी ह.भ.प. अरुण महाराज आळजापुर, दि. 31 रोजी ह.भ.प. दिपक मेटे महाराज केज, दि. 1 सप्टेंबर रोजी ह.भ.प. जालंधर नरवडे महाराज नगर, दि. 2 रोजी ह.भ.प. गणेश बरगे महाराज पंढरपूरकर यांचे किर्तन होणार असून दि. 3 सप्टेंबर रोजी ह.भ.प. ज्ञानेश्वर माळी महाराज नंदुरबार यांचे काल्याचे किर्तन होणार आहे.
तसेच श्रीकृष्णाचे मुर्तीपूजन पोलीस निरीक्षक राजेंद्र बोकडे यांच्या हस्ते तर ज्ञानेश्वरी ग्रंथपूजन मुख्याधिकारी अतिषकुमार लोकरे, तुकाराम गाथा पूजन पत्रकार संघाचे सर्व पदाधिकारी यांच्या हस्ते होणार असून श्रीकृष्ण मुर्ती प्रतिष्ठापना सौ व श्री सुहास शामराव गायकवाड, सौ व श्री किरण नरसिंग साठे यांच्या हस्ते होणार आहे.
त्याचबरोबर दिनेश अग्रवाल यांच्यावतीने उपस्थित भाविक भक्तांना महाप्रसादाचे वाटप होणार आहे. दि. 3 सप्टेंबर रोजी दिंडी मिरवणूक होवून या सप्ताहाची सांगता होणार आहे. तरी या सर्व कार्यक्रमाचा लाभ परिसरातील भाविक भक्तांनी घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
दहिदंडी नावनोंदणीसाठी नितीन रोचकरी (मो.नं. 9850254959) यांच्याकडे संपर्क साधावा...