तुळजापूर :-  श्री क्षेत्र तुळजापूर येथील महाद्वार रोड व परिसरात श्री तुळजाभवानी मातेस अर्पण करण्यासाठी साडयांची विक्री होते. काहींनी सहावारी विक्री करण्याच्या नावाखाली साडीच्या पॅकिंगमध्ये साडीचा तुकडा (चिरडी) विकत असल्याबाबत असंख्य तक्रारी मंदीर प्रशासनाकडे प्राप्त झाल्याने संबंधितांवर प्रचलित कायदयाच्या तरतुदीनुसार तात्काळ कारवाई करण्याचे आदेश नुकतेच श्री तुळजाभवानी मंदीर संस्थानचे व्यवस्थापक तथा तहसिलदार यांनी निरीक्षक वजन व मापी तुळजापूर यांना दिले आहे.

तहसिलदार यांनी आदेश पत्रात पुढे म्हटले आहे की, विक्रीसाठी ठेवलेल्या साडीच्या पॅकेजवर त्या साडीचे सविस्तर वर्णन उदा. वजन, लांबी इ. असणे आवश्यक आहे. मात्र प्राप्त तक्रारीनुसार असे असल्याचे दिसून येत नाही. श्री क्षेत्र तुळजापूर येथील साडया विक्रीबाबत जिल्हाधिकारी यांचे पत्र दि. 31/7/2018 अन्वये सदरील कारवाईचे आदेश देण्यात आल्याचे पत्रात नमूद केले आहे.

दरम्यान, याप्रकरणी तुळजापूर येथील विजय भोसले यांनी मंदिर परिसरातील काही दुकानांमधून भाविकांची फसवणूक सुरु असल्याचे प्रकरण उघडकीस आणून नामात्र किंमतीच्या वस्त्राला अडीच ते तीन हजार रुपयाचे महावस्त्र बनवून भाविकांना विकत असल्याची व त्यांची फसवूणक होत असल्याची तक्रार भोसले यांनी मंदिर प्रशासन व संबंधितांना मार्च 2018 मध्ये वेळोवेळी केले होते. त्यावरुन वरील कारवाईचे आदेश दिले आहे.

 
Top