संग्रहित छायाचित्र

तुळजापूर :- पारंपरिक लोककला संवर्धन व संशोधन केंद्र अंतर्गत राज्यव्यापी आराधी, गोंधळी, वाघ्या, शाहीर, भजनी परिषद आयोजित मराठवाडास्तरीय पारंपरिक लोककला महोत्सवाचे आयोजन रविवार दि. १९ ऑगस्ट रोजी तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी पुजारी मंडळ मंगल कार्यालय, जुन्या बसस्थानकासमोर येथे केले आहे. हा महोत्सव दिवसभरात एकूण तीन सत्रात होणार असल्याचे संयोजकांच्या वतीने सांगण्यात आले आहे.

या महोत्सवात पहिले सत्राचे उद्घाटन सकाळी ०९ वाजता होणार असून उद्घाटक म्हणून माजी राज्यमंत्री तथा विद्यमान आमदार मधुकरराव चव्हाण, माजी राज्यमंत्री तथा विद्यमान आमदार बसवराज पाटील यांच्या शुभहस्ते होणार असून या प्रसंगी सत्कारमूर्ती म्हणून सामाजिक लोकनेते पुरस्कार प्राप्त आरिफ सिद्दीकी, विद्यार्थी सहायक सेवा पुरस्कार प्राप्त प्रा. दिलीपराव गरुड व संत सेवक पुरस्कार प्राप्त प्रदीप गारटकर यांचा गौरव करण्यात येणार आहे. 

दुसऱ्या सत्राचे उद्घाटन दुपारी ०१ वाजता होणार असून उद्घाटक म्हणून खासदार प्रा. रवींद्र गायकवाड, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विचारवंत गिरीश प्रभुणे, भाजपाचे प्रदेश सरचिटणीस तथा आमदार सुजितसिंहजी ठाकूर व आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या शुभहस्ते होणार असून या प्रसंगी सत्कारमूर्ती म्हणून गोंधळी समाज सेवा पुरस्कार प्राप्त भालचंद्र रुपदास व सुरक्षा सेवा पुरस्कार प्राप्त पोलीस निरीक्षक राजेंद्र बोकडे यांचा गौरव होणार आहे. 

या महोत्सवाच्या शेवटच्या सत्रात अर्थात समारोप सत्र सायंकाळी ०५ वाजता होणार असून उद्घाटक म्हणून विरोधी पक्ष नेते विधान परिषद धनंजय मुंडे, माजी राज्यमंत्री तथा आमदार राणाजगजीतसिंह पाटील,आमदार राहूल मोटे व जिल्हा परिषद अध्यक्ष नेताजी पाटील यांच्या शुभहस्ते होणार आहे. 

या महोत्सवाचे आयोजन भारतीय संस्कृतीचे रक्षक व सर्व धर्म पंथातील देवदेवतांचे उपासक असणाऱ्या पारंपरिक लोककलावंतांच्या समस्यांकडे लक्ष केंद्रित करण्यासाठी तसेच लोकाश्रय आणि राजाश्रय मिळावा या उद्यात हेतूने प्रेरित होऊन केले आहे. तरी या सदरील महोत्सवात जास्तीत जास्त कलावंतांनी व नागरिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन स्वागताध्यक्ष श्रीकांत रसाळ, मुख्य संयोजक राजेंद्र वनारसे, निमंत्रक तथा प्रांताध्यक्ष राजेंद्र गायकवाड (गोंधळी) संघटक सचिव अॅड. शिवकुमार स्वामी, जिल्हाध्यक्ष ह.भ.प. काकासाहेब पाटील, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष मीराताई गायकवाड व तालुकाध्यक्ष पुरुषोत्तम कुरुलकर यांनी केले आहे.
 
Top