नळदुर्ग :- येथील बालाघाट महाविद्यालयाच्या प्रशासनाला दिलेल्या आश्वासनाचा विसर पडला असून महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी कॉलेज समोर बस थांबा फलक बसवण्याचे आश्वासन देऊन महिना उलटला मात्र अजूनही या ठिकाणी विनंती बस थांब्याचा फलक बसविले नाही. यामुळे ग्रामीण भागातून शिक्षणासाठी एसटी बसने येणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. यावरून बालाघाट महाविद्यालयाच्या प्रशासनाचा ढिसाळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. विशेष बाब म्हणजे वर्षभरापूर्वी मागील शैक्षणिक वर्षामध्येही अशाच प्रकारचे आश्वासन येथील प्राचार्यांनी दिले होते. मात्र त्यावेळीही बस थांबाचा फलक बसवण्यात आला नव्हता.
महाविद्यालयाच्या प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे विद्यार्थ्यांना मात्र नाहकच मनस्ताप सहन करावा लागत आहे. अशा वेळी बालाघाट शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, सचिव व संचालकांनी या बाबीकडे गांभीर्याने पाहण्याची गरज निर्माण झाली आहे. महाविद्यालय प्रशासनाच्या या डोळेझाक करणाऱ्या वृत्तीमुळे बालाघाट महाविद्यालयाचे व पर्यायाने बालाघाट शिक्षणसंस्थेचीही मोठ्या प्रमाणात बदनामी होत आहे. तसेच विद्यार्थ्यांमध्ये चुकीचा संदेश जात असून पालकांमधून ही यामुळे नाराजी व्यक्त केली जात आहे.
याप्रकरणी राष्ट्रवादीचे युवक शहराध्यक्ष गणेश मोरडे यांनीही बसथांब्यासाठी निवेदन देवून आंदोलनाचा इशारा दिला आहे.