तुळजापूर :  
    *'बिनभिंतीची उघडी शाळा 
         लाखो इथले गुरु |
         झाडे,वेली,पशु,पाखरे
          यांशी गोष्टी करु||
      प्रसिद्ध कवी व गीतकार  ग.दि.माडगूळकर  यांनी वरील रचनेत निसर्ग हा फार मोठा गुरु असून त्याचेकडून खूप काही शिकण्यासारखे असते; असे वर्णन केले आहे.निसर्गाच्या सान्निध्यात मुले रमतात,आनंदानुभूती घेतात.निरीक्षण,कार्यकारणभाव यांसारख्या वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासणार्या गुणांचा मुलांमध्ये नकळत विकास होत असतो.चिकीत्सक विचार व सर्जनशीलता ही जीवनकौशल्ये अंगी बाणली जातात.यांसारखे विविध उद्देश डोळ्यांसमोर ठेऊन जि.प.प्रा.शाळा पांगरदरवाडी ता. तुळजापूर येथील इ.3 री ते 8 वी.तील विद्यार्थ्यांची एक दिवसाची 'निसर्गसहल तथा वनभोजन' पांगरदरवाडी गावापासून दोन किमी.अंतरावर  एका टेकडीवर वनविभाग क्षेत्रात स्थित असणारे'पिरबाबा' देवस्थान ह्या निसर्गरम्य ठिकाणी आयोजित करण्यात आली.या सहलीद्वारे 'दफ्तराविना शाळा' हा उपक्रमही आपसूकपणे साध्य झाला.
     या निसर्गसहलीत विद्यार्थ्यांना चार भिंतीच्या बाहेरील उघड्या निसर्गशाळेत स्वयंअध्ययनाची  संधी दिली.या निसर्गसहलीत विद्यार्थ्यांना झाडे,पक्षीनिरीक्षण करण्यासाठी तसेच निसर्गात मुक्तपणे संचार करण्याचे,निसर्गाच्या कुशीत आनंदाने गाणी म्हणत रमण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले.परंतु ह्या सार्या गोष्टी बिनदिक्कतपणे करत असताना पर्यावरणाचे कसलेही नुकसान होणार नाही वा हानी पोहोचणार नाही याबाबत दक्षता घेण्याच्या सुचनाही देण्यात आल्या. सर्व मुलांनी एकत्रितपणे घेतलेले वनभोजन विद्यार्थ्यांमधील सहकार्य वृत्ती, परस्परांविषयी आस्था,सर्वधर्मसमभाव इ.गुणांबरोबरच स्वातंत्र्य ,समता,बंधुता व न्याय यांसारख्या संविधानात्मक मूल्यांचेही अप्रत्यक्षपणे संस्कार दृढ करण्यात आले.निश्चितच या एक दिवशीय निसर्गशाळेमध्ये पांगरदरवाडी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी निसर्ग हा गुरु ठरला.या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांसमवेत पांगरदरवाडी शाळेतील शिक्षकही  उपस्थित होते. शिक्षकही एक दिवसाचे निसर्गाचे विद्यार्थी ठरले.

 
Top