तुळजापूर (दास पाटील) :-

पूरग्रस्त केरळ राज्याला नैसर्गीक आपत्तीमधून सावरण्यासाठी आर्थीक मदत करणे नैतीकता समजून तुळजापूर शहर भाजपाच्या वतीने जनतेतून निधी संकलन मोहीम राबविण्यात आली. यात ३२,११० रु.चे निधी संकलन झाले. ही रक्कम जिल्हा प्रशासनाकडे केरळ पूरग्रस्तांच्या मदतनिधीत पाठवण्यासाठी सुपुर्द करण्यात येणार आहे. 

हे मदत निधी संकलन भाजप जिल्हा कोषाध्यक्ष नागेश नाईक यांच्या संकल्पनेतून करण्यात आले. मदतनिधीसाठी बंदीस्त बाॅक्स तयार करण्यात आले होते. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून या निधीसंकलनास प्रारंभ करण्यात आला. भाजपा कार्यकर्त्यांनी शहरातील मुख्य रस्त्यांवर फेरी काढली. यातून शहरातील व्यापारी, नागरीकांकडून त्यांच्या स्वइच्छेने प्रदान केलेला निधी संकलीत करण्यात आला. संकलीत झालेला मदतनिधी रीतसर जिल्हा प्रशासनाच्या स्वाधीन करण्यात येणार आहे.

निधी संकलनानंतर आर्य चौक येथे बंदीस्त बाॅक्स सर्वांसमक्ष उघडण्यात आले. या निधी संकलनात एकूण ३२,११० रु. जमा झाले आहेत. 

या मदत फेरीमध्ये गुलचंद व्यवहारे, विकास मलबा, सुहास साळुंके, इंद्रजित साळुंके, प्रसाद पानपुडे, विपीन शिंदे, गिरीश देवळालकर, सागर कदम, रवी साळुंके, गणेश वेदपाठक हे उपस्थित होते.

भाजप पक्ष राज्यात आणि केंद्रात सत्तेवर आहे. तुळजापूर कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीचे अधिष्ठान असलेले शहर आहे. त्यामुळे भाजपचे राज्य तसेच केंद्रातील विविध आमदार, खासदार, मंत्री देवीदर्शनासाठी येत असतात. त्यावेळी भाजपाच्या स्थानिक नेते, कार्यकर्त्यांची मोठी भाऊगर्दी होते. नेतेमंडळी सोबत फोटो सेल्फी काढण्यात ही मंडळी आघाडीवर असते. केवळ चमकोगिरीसाठी हे फोटो लगेच सोशल मिडियावर टाकले जातात. मात्र राज्यात, केंद्रात सत्ता असण्याच्या गप्पा मारणारे बहुतांश फोटोवीर या मदतनिधी फेरीकडे फिरकलेही नाहीत. केवळ १० ते १२ स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते या निधीसंकलनात सहभागी झाले होते. भाजपाच्या अनेक कार्यकर्त्यांनी निधी संकलनाच्या मोहिमेला दांडी मारली. बोटावर मोजता येण्या इतक्याच कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमुळे नागरिकांत उलट सुलट चर्चा रंगत आहेत.
 
Top