नळदुर्ग :- तुळजापुर तालुक्यातील शिरगापूर गावास बुधवार दि. 22 ऑगस्ट रोजी राज्य परिवहन महामंडळ उस्मानाबादचे वाहतुक निरीक्षक गिरी यांनी भेट देवून पाहणी केली. यावेळी त्यांनी एकल महिला संघटनेच्या पदाधिका-यांची भेट घेवून किरकोळ रस्ता दुरुस्त केल्यास येत्या चार दिवसात बस सेवा चालू करण्याचे आश्वासन गिरी यांनी दिले. यावेळी संघटनेच्या महानंदा चव्हाण, लक्ष्मी वाघमारे, सरपंच अंकुश कदम, विनायक जाधव यांच्यासह महिला, ग्रामस्थ उपस्थित होते.
दरम्यान, एकल महिला संघटनेच्यावतीने गावात बस सेवा चालू व्हावी, या मागणीसाठी 27 ऑगस्ट रोजी रास्ता रोको करण्याचा इशारा देण्यात आला होता. मात्र याची दखल घेतल्यामुळे सदरील आंदोलन रद्द करण्यात आला आहे. महिलांनी बस सुरू करण्याच्या मागणीची दखल घेण्यास भाग पडल्याने सर्व स्तरातून कौतुक होत आहे.