तुळजापूर (दास पाटील) :-

येथील घाटशीळ रोड परिसरात घाणीचे प्रचंड साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे येथील रहिवाशांच्या आरोग्यास मोठा धोका निर्माण झाला आहे. या परिसरात पालिकेने स्वच्छतेचे काम त्वरीत करावे अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

तुळजापूर शहरातील घाटशीळ रोड परिसरात मागील अनेक दिवसांपासून घाण पसरली आहे. गटारे, नाल्या पूर्ण भरून ओसांडून वाहत आहेत. मागील चार दिवसांच्या पावसामुळे तर अधिकच दुरावस्था झाली आहे. नालीतील घाण रस्त्यावरून वाहत असल्यामुळे येथून चालणेही मुश्किल झाले आहे. घाणीमुळे प्रचंड दुर्गंधी पसरली असल्याने रहिवाशांच्या आरोग्यास मोठा धोका निर्माण झाला आहे. चिखल, घाणीतून चालताना मोठी कसरत करावी लागत आहे. भटके कुत्रे, मोकाट डुकरे, गच्च भरलेल्या कचराकुंड्या यामुळे या परिसराला बकाल स्वरूप आले आहे. यामुळे येथील रहिवाशांमधून प्रचंड संताप व्यक्त होत आहे. या प्रभागाकडे नगरपरिषद स्वच्छता विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष होताना दिसत आहे.



दोन नगरसेवक आणि एक स्विकृत नगरसेवक या प्रभागात आहेत. पैकी स्विकृत नगरसेवक याच भागातील रहीवासी आहेत. मात्र तरीही पालिका प्रशासन या गंभीर बाबीकडे डोळेझाक करत आहे.

मागील दोन तीन दिवसापासून येत असलेल्या पावसामुळे परिस्थिती अधिकच बिकट झालेली दिसून येत आहे. वाढत्या घाणीमुळे साथीचे रोग पसरण्याची मोठी भीती निर्माण झाली आहे.


त्यामुळे येथील रहिवासी संतप्त झाले असून, या भागातील  स्वच्छता तात्काळ करण्याची मागणी होत आहे.

व्हिडिओ पहा -


 
Top