तुळजापूर (दास पाटील) :-
तुळजापूर शहरात मुस्लीम बांधवांनी ईदची नमाज अदा करुन व कुर्बानी देऊन मोठया उत्साहात बकरी ईद साजरी केली. यावेळी शहरातील हिंदू बांधवांनी मुस्लीम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.
घाटशिळ रोडवरील ईदगाह मैदान येथे बुधवारी दि.२२ रोजी सकाळी ९ च्या सुमारास मौलाना बिलाल रजा व मौलाना गुलाम मोहम्मद यांनी मुस्लीम बांधवांना बकरी ईद व कुर्बानीचे महत्व सांगितले. मौलाना बिलाल रजा यांनी नमाजाचे पठण केले. यावेळी हजारो मुस्लीम बांधवांनी एकत्रीतपणे बकरी ईदची ईद-उल-अज्हा ही नमाज अदा केली. नमाजनंतर सर्व नागरीकांच्या सुख-समृध्दीसाठी, पाऊस, व केरळमधील पूरग्रस्त लोकांसाठी अल्लाहजवळ प्रार्थना (दुवॉ) केली. नमाजनंतर मुस्लीम बांधवांनी एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.
नमाजनंतर राष्ट्रवादीचे युवक तालुकाध्यक्ष आनंद कंदले, शहराध्यक्ष संदीप गंगणे, नगरसेवक सचिन रोचकरी, यांच्यासह मान्यवरांनी ईदगाह मैदानांवर मुस्लीम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून तुळजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र बोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली ईदगाह मैदानावर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यांत आला होता.