नळदुर्ग :- शहापूर ता.तुळजापूर येथील एका घरावर अन्न व औषध प्रशासनाने शनिवार दि.१८ रोजी धाड टाकून दिड लाख रुपये किंमतीची सुगंधी सुपारी व तंबाखू जप्त केली. माञ नळदुर्गमध्ये असंख्य ठिकाणी खुलेआम गुटखा विक्री होत असताना अशी कारवाई कधी होणार असा प्रश्न नागरिकांतून विचारला जात आहे.
अन्न व औषध प्रशासनाच्या अन्न सुरक्षा अधिकारी रेणुका पाटील यांनी शनिवार दि.१८ रोजी शहापूर येथील मुकूंद विश्वनाथ शिंदे यांच्या घरावर धाड टाकली. यात प्रतिबंधित असलेली सुगंधी सुपारी व सुगंधी तंबाखू जप्त केली. याची किंमत सुमारे १ लाख ४० हजार रुपये आहे.
अन्न व औषध प्रशासनास शहापूर येथे सुगंधी तंबाखू व सुगंधी सुपारी साठा करुन ठेवली असल्याची माहिती मिळाली. या कारवाईत नमुना सहाय्यक कांबळे, वाहन चालक नाना गाढवे यांचा समावेश होता.
नळदुर्गसह परिसरातही पान टपरिमधून बंदी आसलेला गुटखा व सुगंधी सुपारी मोठ्या प्रमाणात विक्री होत आसल्याचे निदर्शनास आणल्यानंतर नळदुर्गसह अणदुर, जळकोट व परिसरात लवकरच अशी कारवाई करण्याचे सुतोवाच अन्न सुरक्षा आधिकारी रेणूका पाटील यांनी दिले.