
तुळजापूर :-
तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या मनमानी कारभाराचा फटका बुधवारी(दि. ८) तुळजाभवानी मातेच्या सायंकाळच्या पारंपरिक प्रक्षाळ पुजेला बसला. मंदिर संस्थानने प्रक्षाळ पुजेला स्थानिक भाविकांना न सोडल्याने इतिहासात पहिल्यांदाच कोणतीही पदे अथवा कवणे न म्हणता प्रक्षाळ पूजा उरकण्यात आली.
तुळजाभवानी मंदिर संस्थानने प्रक्षाळ पुजेला दररोज उपस्थित राहणाऱ्या स्थानिक महिला व पुरूष भाविकांना बुधवारी सायंकाळी नेहमीप्रमाणे न्हानीद्वारातून मंदिरात सोडण्यास मज्जाव केला. यावेळी भाविकांनी मंदिर प्रशासनाचा निषेध करीत तेथेच चिंतामणीसमोर ठिय्या मांडला. दरम्यान, प्रक्षाळ पुजेची वेळ झाल्याने महंत तुकोजी बुवांनी प्रक्षाळ पुजेचा इतर विधी परस्पर उरकल्याचे सांगण्यात आले. कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेचे मंदिर उघडण्याच्या वेळी चरणतीर्थ पूजा व सायंकाळी मंदिर बंद करण्याच्या वेळी प्रक्षाळ पूजा या दोन महत्त्वाच्या धार्मिक विधी आहेत. चरणतीर्थ पूजा व प्रक्षाळ पुजेच्या वेळी २० ते २२ स्थानिक महिला, पुरूष भाविक आवर्जून धार्मिक विधीत सहभागी होतात. ही अनादी काळापासून चालत आलेली परंपरा आहे. परंतु, मंदिर संस्थानने स्थानिक महिला, पुरूष भाविकांना बुधवारी मंदिरात सोडण्यास मज्जाव केल्याने पेच निर्माण आहे. तुतुतु लस्वामिनी तुळजाभवानी मातेच्या पहाटेच्या चरणतीर्थ पुजेच्यावेळी निद्रिस्त तुळजाभवानी मातेला उठविण्यासाठी तसेच सायंकाळी प्रक्षाळ पुजेच्यावेळी तुळजाभवानी देवीच्या सुख निद्रेसाठी स्थानिक महिला पुरूष भाविक देवीची गीते, कवणे गातात. दोन्ही पूजा साधारण अर्धा तास चालतात. देवीची गीते म्हणण्याची अनादीकाळाची परंपरा आहे.
रूढी परंपरा मोडीत काढल्या
तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या विश्वस्तांनी गेल्या काही वर्षात अनेक धार्मिक रूढी परंपरा मोडीत काढल्या आहेत, असा आरोप होत आहे. मंदिर संस्थान पुजाऱ्यावर कारवाई करण्यासाठी निजाम कालीन १९०९ सालचा देऊळ कवायत कायदा व धार्मिक विधीत बदल करण्यासाठी धर्मादाय कायद्याचा सोयीस्करपणे वापर करत असल्याचा आरोप होत आहे.
प्रक्षाळ मंडळ सहकार्य करीत नसल्याने पेच
धर्मादाय आयुक्तांच्या आदेशानुसार चरणतीर्थ पुजे प्रमाणेच प्रक्षाळ मंडळाच्या भाविकांना अॅक्सेस कार्ड घेऊन अभिषेक हाॅलमधून सोडण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. परंतु, प्रक्षाळ मंडळ सहकार्य न करता न्हानीद्वार मार्गे सोडण्यासाठी अडून बसल्याने पेच निर्माण झाला आहे. चर्चा सुरू आहे लवकरच मार्ग निघेल. - दिलीप नाईकवाडी, धार्मिक व्यवस्थापक, मंदिर संस्थान. 3
साभार - दै. दिव्यमराठी