तुळजापूर (दास पाटील) :- आई राजा उदोऽ उदोऽऽच्या जयघोषात सोलापूर येथील पाच भक्तांकडून महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीस 26 तोळे सोन्याचा हार गुरुवार दि. 23 ऑगस्ट रोजी रात्री प्रक्षाळ पूजेपूर्वी अर्पण करण्यात आला. मंदिर संस्थानचे व्यवस्थापक तथा तहसिलदार राहुल पाटील यांच्याकडे हार देण्यात आला. या सोन्याच्या हाराची मंदिराच्या अभिलेखामध्ये नोंद करण्यात आली आहे.
पाळीचे पुजारी वीरेंद्र कदम यांनी देवीस हार अर्पण केला. सदर दान देणारे पाच व्यक्ती सोलापूरचे व्यापारी आहेत. आम्ही हा सोन्याचा हार भक्तीभावाने देवीचरणी अर्पण केला आहे. तरीही आमची नावे प्रसिध्द केली जावू नयेत, अशी विनंती त्यांनी केली. मंदीर प्रशासनाच्यावतीने त्यांचा देवीची प्रतिमा देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी तहसीलदार तथा मंदीर व्यवस्थापक (प्रशासन) राहुल पाटील, धार्मिक व्यवस्थापक दिलीप नाईकवाडी, महंत तुकोजीबुवा, पुजारी संजय सोंजी, भोपे पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमरराजे परमेश्वर, पुजारी अतुल मलबा, सचिन परमेश्वर, शशिकांत कदम, विकास मलबा आदींची उपस्थिती होती.
