उस्मानाबाद :- मराठवाडा साहित्य परिषद आणि प्रबोधिनी, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने उस्मानाबाद येथील ज्येष्ठ साहित्यिक माधव गरड यांच्या ‘वादळ मराठा मनातलं’ या वैचारिक साहित्यकृतीच्या प्रकाशन सोहळ्याचे आयोजन रविवार, 26 ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आले आहे. शहरातील पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात सकाळी 10.30 वाजता हा कार्यक्रम होणार आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री तथा आमदार मधुकर चव्हाण हे राहणार आहेत. तर आमदार राणाजगजितसिंह पाटील, आमदार विक्रम काळे, नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अरविंद गोरे यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून विश्वास शिंदे, नितीन काळे, अनिल खोचरे, डॉ. सतीश कदम, सुधीर पाटील, राजेंद्र गपाट हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत. प्रमुख वक्ते म्हणून रवींद्र केसकर यांची उपस्थिती असणार आहे. रविवारी सकाळी ठीक 10.30 वाजता आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास शहर व परिसरातील साहित्यरसिकांनी व मराठा समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक नितीन तावडे, सचिन पाटील, प्रतापसिंह गरड यांनी केले आहे.