मृत बबिता शिंदे
अनैतिक संबंधातून निर्माण झालेल्या नात्यामध्ये पैशाच्या अडचणीने वाद होवून रखेलीचा जीव घेण्यापर्यंत टोकाची वेळ एका ट्रक ड्रायव्हरवर आली. मात्र नळदुर्ग पोलिसांनी आपले कौशल्य पणाला लावून अवघ्या पाच तासात अनोळखी महिलेच्या मृतदेहापासून सुरु झालेला तपास खुन्यास अटक करुन गजाआड केले. मात्र या घटनेमुळे अनैतिक संबंधामुळे मृत महिलेच्या दोन निष्पाप मुलांवर अनाथ होण्याची वेळ ओढावली.
आरोपी बबन चव्हाण
      बुधवार दि. 11 जुलै रोजी रिमिझिम पाऊस पडत होता. नळदुर्ग पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी दैनंदिन कामाचा आढावा घेत होते. याचवेळी रात्री सव्वा नऊ वाजता ठाण्यातील फोन खणाणला. हा फोन 108 ॲम्ब्युल्सच्या कर्मचा-यांनी करुन माहिती दिली की, नळदुर्ग-तुळजापूर रोडवरील चिवरी पाटी (ता. तुळजापूर) येथे रस्त्याच्या कडेला अनोळखी महिलेचा मृतदेह आढळला असून हा अपघात नसल्याचे प्रत्यक्षदर्शनी आढळून आल्याचे व आपण तात्काळ या ठिकाणी यावे असे त्यांने सांगितले. यानंतर लगेच नळदुर्गचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले, उपनिरीक्षक विठ्ठल वारे, पो.ना. दत्तात्रय शिंदे, पो.ना. किशोर शेवाळे, पो.ना. संतोष सोनवणे, कॉन्स्टेबल शशिकांत हजारे आदी फौजफाटा घटनास्थळी पोहचले. यावेळी पोलीस पाटील योगेश बिराजदार यांनी घटनास्थळी पुढे येवून पोलिस कर्मचा-यांना अधिक माहिती देवून दाखवले. त्यावरुन ही घटना मिरकले यांनी वरिष्ठांना कळविल्यावरुन उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप घुगे व स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे कर्मचा-यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. त्यानंतर पोलिसांनी दोन पंचासमक्ष पंचनामा केले. पुढे शवविच्छेदनासाठी जळकोट (ता. तुळजापूर) प्रा.आ. केंद्रात पाठविण्यात आले. पोलिसासमोर मृत महिलेचे ओळख पटविण्याचे आवाहन होते. त्यामुळे सोशल मिडियावर व इतर उपलब्ध माध्यमाच्या साहाय्याने मृत अनोळखी महिलेची ओळख पटविण्यासाठी प्रयत्न केल्याने काही तासांतच नळदुर्ग येथील अरुणा आलुरे या महिलेनी मृत महिलेबाबत माहिती देत मयत महिला ही बबिता तुकाराम शिंदे (वय 36 वर्षे, रा. मराठा गल्ली, नळदुर्ग) येथील असल्याचे पोलिसांना सांगितले. त्यावरुन मयताचा मुलगा शुभम तुकाराम शिंदे (वय 14 वर्षे) याच्याकडे विचारपूस केली असता या मुलाने आपली आई दुपारी दोन वाजता बबन काका सोबत बारुळ ता. तुळजापूर येथे नातेवाईकाच्या घरी गेल्याचे सांगितले. यावेळी पोलिसांनी आईचा फोटो मागवून खात्री केली. पोलिसांनी शुभम यास तातडीने घेवून जळकोट प्रा.आ. केंद्रात असलेला महिलेचा मृतदेह दाखवला. यावेळी शुभमने ही आपली आई बबिता असल्याचे सांगितले. शुभमच्या माहितीवरुन बबन (बाबू) पोमा चव्हाण याचा शोध घेत जकणी तांडा येथे गेले असता तो तेथे आढळून आला नाही म्हणून त्याच्या गावी नागझरी तांडा ता. तुळजापूर येथे गेले असता दि. 12 जुलैच्या पहाटे बबन घरी आढळून आला. बबन याच्याकडे पोलिसांनी कसून चौकशी केली असता प्रथम तो उडवाउडवीचे उत्तर देवू लागला. मात्र पोलिसी खाक्या दाखवताच आरोपी बबनने मयत बबिताचा खून केल्याची कबूली पोलिसांना दिली.
सपोनि संजीवन मिरकले
       बबिता हिचे माहेर तुळजापूर तालुक्यातील गंधोरा हे गाव असून 17 वर्षापूर्वी तिचे सोलापूर येथील तुकाराम शिंदे याच्याशी लग्न झाले होते. त्यांना सोनाली व शुभम असे दोन मुले आहेत. मात्र बबिता ही गेल्या 12 वर्षापासून नव-यापासून वेगळी नळदुर्ग येथे मुलासह राहून मोलमजुरी करत होती. या दरम्यान गेल्या तीन वर्षापासून ट्रक ड्रायव्हर असलेला बबन चव्हाण याच्याशी ओळख झाली. त्यानंतर त्याचे रुपांतर प्रेमात होवून अनैतिक संबंध प्रस्थापित झाले. मृत बबिता ही बबन यास घरखर्चासाठी पैसे हवेत म्हणून सारखा तगादा लावत होती व त्यातून भांडण, तंटे होवू लागले. घटना घडल्याच्या दिवशी म्हणजे दि. 11 जुलै रोजी बबन हा दुपारी अडीच वाजता दुचाकीवरुन (क्रं. एमएच 14 जे 219) नळदुर्ग येथे बबिताच्या घरी येवून त्यास बसवून घेवून गेला. जाताना त्याने नळदुर्ग येथूनच कुरेशी यांच्या चिकन सेंटर मधून दीड किलो चिकन खरेदी करुन ते दोघे बारुळ ता. तुळजापूर या गावी जाण्यासाठी निघाले असता तुळजाभवानी साखर कारखाना पेट्रोल पंपावर पावणे चार वाजता पेट्रोल भरल्याचे पेट्रोल पंपमधील सीसीटीव्ही मध्ये स्पष्ट झाले. तेथून पुढे बारुळ या गावी बबिताचे नातेवाईक ज्योतीबा मुरलीधर कोरे यांच्या घरी जावून चिकन बनविले व तिघांनीही जेवण केले. जेवण करुन दोघे साडे सहा वाजता घरातून निघताना शेजारी दुकानातून अंडे विकत घेतले. गंधोरा जवळ बुस्टर येथे चहा पिऊन पुन्हा नळदुर्गच्या दिशेने दुचाकीवरुन निघाले. चिवरी पाटी आल्यावर बबन याने बबिताचा गळा आवळून जिवे मारले व मृतदेह रोडच्या कडेला फेकला. तेथून तो नागझरी येथील आपला घरी परतला.
     याप्रकरणी पोलिसांनी अवघ्या पाच तासात अनोळखी महिलेची ओळख पटवून मारेक-यास अटक केली व दि. 13 जुलै रोजी तुळजापूर प्रथम वर्ग न्यायालयात हजर केले असता आरोपी बबन यास पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. त्यानंतर दि. 17 जुलै रोजी न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी मंजूर केल्याने उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती कारागृहात आरोपी बबन चव्हाण याची रवानगी करण्यात आली.

- शिवाजी नाईक
संपादक
तुळजापूर लाईव्ह
 
Top