काटी (उमाजी गायकवाड) :-
तुळजापूर तालुक्यातील काटीसह दहिवडी, सावरगाव, वडगाव (काटी), तामलवाडी, सुरतगाव, गंजेवाडी, जळकोटवाडी ,केमवाडी, खुंटेवाडी, आदी गावातील शेतकरी पाऊसाअभावी शेतातील पिके सुखू लागल्याने पुरते धास्तावले असल्याचे चित्र पहावयास मिळत असून मोठय़ा पाऊसाच्या प्रतिक्षेत या भागातील शेतकरी आभाळाकडे टक लावून बघत असल्याचे चित्र सर्रास पहायला मिळत आहे.
शेतात केलेला खर्चही निघतो की नाही याची चिंता शेतकऱ्याला लागून राहिली आहे. विहिरी, ओढे, नाले, कोरडे पडले असून परिसरातील तलावातही पाणीसाठा अत्यल्प प्रमाणात असून भविष्यात पाणी प्रश्न भेडसावणार असल्याचे चित्र दिसत आहे. सुरुवातीला चांगला पाऊस झाल्याने मोठ्या आशेने या परिसरात मोठ्या प्रमाणात नगदी पिकांचे पर्याय म्हणुन सोयाबीन,उडीद, मूग तुर आदी पीके घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढल्याने या परिसरात मोठय़ा प्रमाणात सोयाबीन, तूर, मूग, उडीद या पीकाची पेरणी केली. सुरुवातीला पाऊस चांगला झाल्याने पीकही जोरात दिसू लागली होती, त्यावर महागडी औषधे फवारणी, खत पेरणी करुन शेतात आधीच आर्थिक संकटात असुनही उसनवारी पैसे घेऊन शेतात खर्च करण्यात आला.
परंतु गेल्या महिनाभरापासून पाऊसाने दडी मारल्याने पीक शेंगा लागण्यापुवीॅच माना टाकत आहेत. तर काही पीकांना शेंगा लागल्या असल्या तरी भरण्याआधीच पाऊसाअभावी पीकांनी माना टाकल्या असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. पाऊसाअभावी पीकाची वाढ खुंटली आहे, शेंगा भरण्याअगोदरच सोयाबीन पीक कोमेजून जात आहेत. आळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढल्याने पानाची चाळण झाली आहे, महागडी औषध फवारणी करूनही लष्करी आळी मरत नसल्याने सोयाबीन पिकाच्या पानाची अक्षरशः चाळण झाली आहे. फुलगळती झाल्याने फुलापासून शेंगा तयार होण्याची प्रक्रिया पूर्णपणे खंडित झाली आहे. अशा परिस्थितीत हातात आलेली पिके पाऊसाअभावी जाण्याच्याभितीने काटीसह परिसरातील बळीराजा हतबल झाल्याचे विदारक चित्र दिसत आहे, तर काही शेतकरी स्प्रिंकलरच्या सहाय्याने पाणी देऊन पीक वाचवण्यासाठी धडपडत आहेत. सततच्या नापिकीमुळे बळीराजा पुरता मेटाकुटीला आला असून उसनवारी करून एकरी जवळपास पंधरा हजार रुपये खर्च करून पिकांची अशी अवस्था पाहून आधीच कर्जाच्या ओझ्याखाली दबलेला बळीराजा डोक्यावर आणखी कर्जाचा भार वाढणार या भितीने धास्तावला असुन मोठ्या उत्पन्नाची आशा आता मावळली असून मोठय़ा पाऊसाच्या अपेक्षेने या भागातील बळीराजा आभाळाकडे टक लावून बघत असल्याचे चित्र परिसरात पहायला मिळत आहे.