उस्मानाबाद :- जमियत उलेमा-ए-हिंद, महाराष्ट्रच्या शिष्टमंडळाने शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अल्पसंख्याक समुदायासाठी राबविण्यात येणार्‍या विविध कल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीबाबत विस्तृत चर्चा करण्यासाठी मुंबई येथे भेट घेतली. शिक्षण आणि संस्कृती संवर्धनासाठी जमियत उलेमा-ए-हिंद देत असलेल्या योगदानाची यावेळी मुख्यमंत्र्यांनी माहिती जाणून घेतल्याचे संघटनेचे उस्मानाबाद जिल्हा सचिव हाफीज अल्लीमोद्दीन शेख यांनी बोलताना सांगितले.
    शिष्टमंडळास मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, अल्पसंख्यक समुदायाच्या विद्यार्थ्यांना सुद्धा उच्च शिक्षणासह 605 अभ्यासक्रमांसाठी 50 टक्के शुल्क प्रतिपूर्तीचा लाभ दिला जात आहे. बदलत्या काळात अल्पसंख्यक तरूणांना उद्योजकतेच्या व्यापक संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीकोनातून औरंगाबाद येथे अल्पसंख्यक समुदायासाठी कौशल्य प्रशिक्षण विद्यापीठ स्थापन करण्यात येत आहे. यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरू असून, तो अंतिम टप्प्यात आहे. अशाप्रकारचे हे देशातील पहिले विद्यापीठ राज्यात स्थापन होणार आहे. अल्पसंख्यक समुदायासाठी विविध कल्याणकारी योजनांवर राज्य सरकारने आपल्या खर्चात आधीच्या तुलनेत तिप्पट वाढ केली आहे. जमियत उलेमा-ए-हिंद ने सरकारसोबत आणखी सहकार्याने काम करीत सरकारच्या या योजना समाजापर्यंत पोहचवाव्यात आणि त्याच्या अंमलबजावणीत सरकारला सहकार्य करावे, असे आवाहन केले. इतरही सर्व मागण्यांबाबत सरकार सकारात्मक असून, राज्य सरकार अल्पसंख्यक समुदायाच्या पाठीशी ठामपणे उभे राहील, असे त्यांनी यावेळी आश्वासन दिले.
या शिष्टमंडळात उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष मौलाना आयुब, जिल्हा उपाध्यक्ष मुफ्ती रहमततुल्ला, जिल्हा सचिव हाफीज अल्लीमोद्दीन शेख यासह इतर सदस्य उपस्थित होते.

संपर्क -
हाफीज अल्लीमोद्दीन शेख 
9860517371

 
Top