उस्मानाबाद :- माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत 'युवा माहिती दूत' हा नाविण्यपूर्ण उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमामुळे राज्यातील कोटयावधी जनतेपर्यंत शासकीय योजना व उपक्रमांची माहिती पोहचण्यास मदत होणार असून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याची 'युवा माहिती दूत' महत्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास पालकमंत्री अर्जुन खोतकर यांनी व्यक्त केला.
युनिसेफच्या सहयोगाने राज्य शासनाचे उच्च शिक्षण विभाग आणि तंत्र शिक्षण विभाग यांच्या प्रत्यक्ष सहभागाने माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने ‘युवा माहिती दूत’ हा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमाचा शुभारंभ पालकमंत्री अर्जुन खोतकर यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी युवा माहिती दूत या उपक्रमाबाबत उपस्थित मान्यवरांना माहिती सांगण्यात आली, त्यानंतर चित्रफीत दाखविण्यात आली. या प्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष नेताजी पाटील, आमदार मधुकरराव चव्हाण, सुजितसिंह ठाकुर, माजी आमदार ओमराजे निंबाळकर, जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते, पोलीस अधीक्षक राजा रामस्वामी, अपर जिल्हाधिकारी पराग सोमण, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे, जिल्हा नियोजन अधिकारी श्री. आडे यांच्यासह विभागप्रमुख उपस्थित होते.
विविध शाखांमध्ये पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या महाविद्यालयातील युवकांमार्फत शासकीय योजनांची माहिती प्रस्तावित लाभार्थ्यांपर्यंत थेटपणे पोहचविण्यात येणार असल्याचे सांगून पालकमंत्री श्री. खोतकर पुढे म्हणाले, शासकीय योजनांच्या माहितीचा प्रसार हा मुख्यत्वे वृत्तपत्रे, दूरचित्रवाणी वाहिन्या आणि रेडिओ यांच्यामार्फत केला जातो. सोशल मीडियाचा होणारा उपयोग मर्यादित स्वरुपाचा आहे. शिवाय, शासकीय योजनांचे बहुतांश प्रस्तावित लाभार्थी हे अर्धशिक्षित, दारिद्रयरेषेखालील आणि दुर्गम भागातील असल्याने वृत्तपत्रे, दूरचित्रवाणीसंच अथवा रेडिओ ही माध्यमे ते वापरतात असे नाही. प्रस्तावित लाभार्थ्यापर्यत न पोहचणाऱ्या शासकीय योजना दुहेरी संवादातून त्यांच्यापर्यत प्रभावीपणे पोहचविण्यासाठी राज्यातील समाजकार्याची आवड असलेल्या उत्साही तरूण वर्गाचे सहाय्य घेण्याचा ‘युवा माहिती दूत’ या उपक्रमाचा महत्वाचा उद्देश आहे, असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
युवा माहिती दूत म्हणून काम केल्यामुळे राज्यशासनाकरिता तळागाळाच्या पातळीवर काम करण्याची महत्वाची संधी युवकांना मिळणार आहे. युवा माहिती दूत’ अशी ओळख राज्यशासनाच्यावतीने त्यांना देण्यात येणार आहे. ठरवून दिलेले काम केल्यानंतर त्यांना शासनाचे डिजिटल प्रमाणपत्र देण्यात देण्यात येणार आहे. शासनाच्या युवा माहिती दूत उपक्रमात जास्ती जास्त महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहनही पालकमंत्री श्री. खोतकर यांनी शेवटी केले.
याप्रसंगी विविध विभागांचे अधिकारी व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.