उस्मानाबाद :- भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या 71 व्या वर्धापन सोहळ्यानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रागंणात राज्यमंत्री पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय आणि वस्त्रोद्योग तथा पालकमंत्री अर्जुन खोतकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते, पोलीस अधीक्षक आर.राजा,अपर जिल्हाधिकारी पराग सोमण,निवासी उप जिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे, जिल्हा कृषी अधीक्षक श्री. उमेश घाटगे, जिल्हा कृषी विकास अधिकारी डॉ.चिमणशेटये, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.एकनाथ माले,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. वडगावे,जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.आघाव,तहसिलदार सुजित नरहरे,राजकुमार माने, जिल्हा क्रिडा अधिकारी संजय महाडिक, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी सोमनाथ रेडडी, पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय रणदिवे तसेच विविध विभागांचे विभाग प्रमुख, कार्यालयप्रमुख उपस्थित होते.  


सर्वप्रथम देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी आत्तापर्यंत अनेक महापुरुषांनी विविध माध्यमातून योगदान दिले, प्रसंगी प्राणांची आहुती दिली, त्या सर्वांना पालकमंत्री श्री.खोतकर यांनी अभिवादन केले.त्यानंतर त्यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील महसूल, पोलीस,वन,आरोग्य, आपत्ती व्यवस्थापन, बळीराजा चेतना अभियान,राष्ट्रीय महामार्ग,कृषी, सहकार,महिला व बाल विकास या विभागांची कामगिरी उत्तम होत असल्याबाबत जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.संजय कोलते, नूतन पोलीस अधीक्षक राजा राम सामी आणि त्यांचे सर्व सहकारी अधिकारी कर्मचारी या सर्वांचे अभिनंदन केले.

विशेषत: शासनाच्या 13 कोटी वृक्ष लागवड महामोहिमेत जिल्ह्याला 28 लाख 18 हजार उद्दिष्ट होते मात्र सर्व यंत्रणांनी मिळून 58 लाख 34 हजार इतके विक्रमी वृक्षारोपण करून जिल्ह्याच्या उज्ज्वल भवितव्याकडे वाटचाल सुरू केली आहे.फॉरेस्ट सर्व्हे ऑफ इंडियाच्या माहितीनुसार उस्मानाबादच्या वृक्षाच्छादनात चार चौरस किलोमीटर इतक्या क्षेत्राची वाढ झाली आहे आणि ही बाब निश्चितच उस्मानाबादच्या भवितव्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे असे सांगून त्यांनी जिल्हयाची आरोग्य यंत्रणाही कामात अग्रेसर आहे. जिल्हा रुग्णालयाकडून जिल्ह्यातील सर्वच दिव्यांगांची तपासणी मोहीम पूर्ण करण्यात आली आणि आता त्यातील गरजूंना अपंगांची तीन चाकी सायकल, काठी, चष्मे,श्रवणयंत्र, कृत्रिम हात-पाय अशा साधनांचे वाटपही लवकरच सुरू करण्यात येणार आहे. त्याचबरोबर आता जिल्ह्यातील सर्व शाळांमधील दिव्यांग विद्यार्थ्यांचीही तालुक्याच्या ठिकाणीच तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे. तसेच टेलीमेडिसीन द्वारा तालुक्याच्या ठिकाणी विशेष वैद्यकीय तज्ञांमार्फत मार्गदर्शन करणारा आपला जिल्हा हा राज्यातील पहिला जिल्हा असून याचबरोबर जिल्हा रुग्णालयांमध्ये व्यसनमुक्ती केंद्र सुरु करणारे आपले जिल्हा रुग्णालय हे राज्यातील पहिले रुग्णालय आहे.

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने बळीराजा चेतना अभियान अंतर्गत आशा कार्यकर्तींच्या मदतीने जिल्ह्यातील जवळपास पंधरा हजार आत्महत्याग्रस्त कुटुंबांची प्रत्यक्ष घरी जाऊन आरोग्य तपासणी केली आणि  उपचाराची गरज असणाऱ्या साधारणत: साडेतीन हजार कुटुंब सदस्यांना प्रत्यक्ष उपचार देण्यास सुरुवात केली. हे काम खरोखरीच संवेदनशील असून आरोग्य विभागाच्या अधिकारी कर्मचार्यांचे पालकमंत्री श्री.खोतकर यांनी  वन आणि आरोग्य विभागाचे विशेष अभिनंदन केले.

खोतकर पुढे म्हणाले की,उस्मानाबाद जिल्हा  पशुपालनामध्ये अग्रेसर आहे. जिल्ह्यातील सुदृढ,सशक्त आणि विविध वंशावळीमधील गोवंशतर उस्मानाबादी जातीच्या शेळ्यांच्या उपलब्धतेमुळे हा प्रदेश नैसर्गिकरित्या समृद्ध आहे.  शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी विशेष मदतीचा कार्यक्रमांतर्गत उस्मानाबाद जिल्ह्यातील 320 त्रस्त कुटुंबांना शेळीगटाचे वाटप करण्यात आले.  

राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत विदर्भ व मराठवाडा विभागात दूध उत्पादन वाढीसाठी राबविण्यात येत असलेल्या प्रकल्पांतर्गत उस्मानाबाद जिल्ह्यातील 493 गावांची निवड करण्यात आली असून यामध्ये  वैरण विकास कार्यक्रम कृत्रिम रेतनाची सुविधा गावापर्यंत पुरविणे, वांजपणा चे निदान करणे,गावपातळीवर पशुवैद्यकीय सेवा व मदर डेरी मार्फत योग्य दरात दूध संकलन असे उपक्रम राबविण्यात येत आहेत.

उस्मानाबाद जिल्हा नीती आयोगाच्या आकांक्षा जिल्ह्यांपैकी एक जिल्हा आहे जिल्ह्यात आर्थिक उत्पन्नाचे दरडोई प्रमाण कमी आहे. यामुळे शेती पूरक उद्योगाची गरज लक्षात घेऊन पालकमंत्री नात्याने मी आणि जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांनी उस्मानाबाद जिल्ह्यासाठी काऊ क्लब ही संकल्पना राज्य शासनाकडे मांडली आणि सततच्या पाठपुराव्यामुळे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांच्याकडून या प्रकल्पास अनुदान देण्याबाबत सहमती मिळाली असल्याचे सांगून ते पुढे म्हणाले की,दुर्मिळ होत असलेल्या गीर गायीचे संवर्धन करून त्याद्वारे शेतकऱ्यांना प्रशिक्षण देऊन दुग्धजन्य पदार्थ गायीच्या गोमूत्र व शेणापासून आयुर्वेदिक औषधे,सौंदर्यप्रसाधने व दैनंदिन जीवनातील उपयोगाच्या वस्तूंची निर्मिती करून त्या उत्पादित पदार्थांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे,हा आमचा मुख्य उद्देश असून या सोबतच कृषी पर्यटन, ऑरगॅनिक फार्मिंग, ऍग्रो प्रोसेसिंग युनिट,पंचकर्म सेंटर व ट्रीटमेंट सेंटर या काऊ क्लबअंतर्गत तयार करण्यात येणार आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील आत्महत्या केलेल्या कुटुंबांचे टाटा सोशल सायन्स या संस्थेकडून सर्वेक्षण झालेले आहे. काऊ क्लब अंतर्गत अशा कुटुंबातील निवडक शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिले जाईल व त्यांच्याद्वारा या काऊ क्लब चे संचालन केले जाईल. उत्पादित मालाच्या फायद्यातून त्यांना नफा वाटप केले जाईल.त्यामुळे त्यांचे आर्थिक बळकटीकरण होईल. भारतीय आयुर्वेदात गोमय पदार्थांचे मोठे महत्त्व आहे.काऊ क्लबमध्ये अशा सर्व पदार्थांची निर्मिती झाल्यानंतर महत्त्वाच्या फूड कंपन्या व सौंदर्य प्रसाधन कंपन्या यांच्यासोबत करार होऊन या प्रकल्पास मार्केट लिंकेज दिले जाईल आणि त्याचसोबत या ठिकाणी कृषी पर्यटन केंद्रही तयार होईल.

जलयुक्त शिवार अभियानाविषयी बोलताना श्री.खोतकर म्हणाले,  या अभियानामुळे उस्मानाबाद जिल्ह्याचे भविष्य बदलणार आहे. या जिल्ह्यात ज्या पद्धतीने जलयुक्त शिवार चे काम झाले ते खरोखरीच प्रशंसनीय आहे.  सन 2015-16 अंतर्गत जिल्ह्यातील 217 गावांची निवड करण्यात आली होती.त्यावर्षी 21 हजार 25 कामे विविध यंत्रणांमार्फत पूर्ण झाली. त्यातून 25 हजार 190 टीसीएम पाणीसाठा क्षमता निर्माण झाली. या कामांमुळे 89 हजार 452 हेक्टर संरक्षित सिंचन क्षेत्र निर्माण होण्यास मदत झाली.

सन २०१६-१७ या वर्षात 191 गावे निवडण्यात आली.यात 16 हजार 795 कामे प्रस्तावित झाली.त्यातून 66 हजार 664 टीसीएम पाणीसाठा क्षमता निर्माण झाली तर या कामांमुळे 12 हजार 343 हेक्टर संरक्षित सिंचन क्षेत्र निर्माण होण्यास मदत झाली.सन २०१७-१८ या वर्षात 178 गावांची निवड करण्यात आली. त्यात 5 हजार 553 कामे प्रस्तावित करण्यात आली आणि यातून 5 हजार 187 कामे पूर्ण झाली.या कामांमधून 58 हजार 691 टीसीएम पाणीसाठा क्षमता निर्माण होऊन 2 हजार 122 हेक्टर संरक्षित सिंचन क्षेत्र निर्माण होण्यास मदत झाली. चालू वर्षीच्या चौथ्या टप्प्यात जिल्ह्यातील 78 गावांची निवड करण्यात आली याप्रमाणे 1 हजार 919 कामे प्रस्तावित करण्यात आली आणि त्यातील 173 कामे पूर्ण झाली आहेत.

शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने सर्वात मोठी कर्ज माफी योजना छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना अंमलात आणली.याविषयी आनंद व्यक्त करताना ते म्हणाले की, उस्मानाबाद जिल्ह्यातील 95 हजार 767 शेतकऱ्यांना 343 कोटी 26 लाख रुपयांची कर्जमाफी मिळाली. संपूर्ण कर्जमाफी 246 कोटी 79 लाख रुपयांची एकूण 46 हजार 51शेतकऱ्यांना मिळाली. एकरकमी परतफेड योजनेत 2हजार 811 शेतकऱ्यांना 30 कोटी 68 लाख रुपयांची कर्जमाफी देण्यात आली तर प्रोत्साहनपर अनुदान योजनेंतर्गत 46 हजार 905 शेतकऱ्यांना 65 कोटी 79 लाख रुपयांची कर्जमाफी देण्यात आली. 

नुकताच 10 ऑगस्ट 2018 रोजी शासनाने नवीन शासन निर्णय पारित केला आहे. यामध्ये शेतकरी कुटुंबातील प्रत्येक पात्र व्यक्तीलाही छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. लवकरच उस्मानाबाद जिल्ह्यातील वाचकांना, विद्यार्थ्यांना डिजिटल ग्रंथालय व आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित ज्ञानाचे भांडार डिजिटल ग्रंथालयाच्या माध्यमातून खुले होणार आहे.जिल्हा वार्षिक योजनेतून आपण उस्मानाबाद जिल्ह्यासाठी हे डिजिटल ग्रंथालय उभे करणार आहोत. या डिजिटल ग्रंथालयाच्या माध्यमातून दुर्मिळ ग्रंथ, हस्तलिखिते,विविध लेखकांची पुस्तके ,स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त पुस्तके एका क्लिकवर वाचकांना उपलब्ध होणार आहेत,अशी माहितीही पालकमंत्री महोद्यांनी यावेळी दिली.

आतापर्यंत आपण विविध विकास कामांसाठी उस्मानाबाद जिल्ह्याला भरीव निधी उपलब्ध करून दिला आहे. नगरपरिषद उस्मानाबाद अंतर्गत सर्व शाळांमध्ये ई-लर्निंग संकल्पना राबविण्यासाठी 72 लाख, उस्मानाबाद शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी 24 लाख अशा विविध प्रकारच्या विकास कामांसाठी  प्रशासनाकडून निधी देण्यात आला आहे आणि उस्मानाबादच्या विकास कामांसाठी यापुढेही अशा प्रकारचा निधी नक्कीच देण्यात येईल,असे आश्वासन पालकमंत्री श्री.खोतकर यांनी दिले.

श्री.खोतकर म्हणाले,केंद्र शासनाने ग्रामस्वराज्य अभियानाच्या माध्यमातून देशातील 115 जिल्ह्यांमध्ये शासनाच्या विविध योजना राबविण्याचे निश्चित केले. यात उस्मानाबादच्या 488 गावांचाही समावेश करण्यात आला. हे अभियान 1 जून ते 15 ऑगस्ट या कालावधीत राबविण्यात आले. प्रामुख्याने प्रधानमंत्री उज्ज्वला योजना,सौभाग्य योजना,  प्रधानमंत्री सहज बिजली हरघर योजना,उजाला योजना, प्रधानमंत्री जनधन योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना,मिशन इंद्रधनुष या योजना या 488 गावांमध्ये मिशन मोडवर राबविण्यात आल्या.

उल्लेखनीय बाब म्हणजे आपल्या जिल्ह्यासाठी शासनाने वैद्यकीय महाविद्यालयाची घोषणा नुकतीच केली आहे. त्याचबरोबर सोलापूर- तुळजापूर-उस्मानाबाद रेल्वे मार्गालाही केंद्र शासनाकडून मंजूरी मिळाली असल्याचेही त्यांनी सांगितले.

अशाच प्रकारची अनेक विकासात्मक कामे आपल्या जिल्ह्यासाठी केली जातील,अशी ग्वाही याप्रसंगी त्यांनी उस्मानाबादकरांना देवून नीती आयोगाने उस्मानाबाद जिल्ह्याचा समावेश आकांक्षित जिल्ह्यांमध्ये केला आहे. जिल्हाधिकारी श्री.गमे आणि त्यांचे सहकारी अधिकारी या जिल्ह्याला मागासलेल्या जिल्ह्यांच्या यादीतून बाहेर काढण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहेत. शिक्षण, कृषी, आरोग्य,कौशल्य विकास,वित्तीय सुधारणा अशा मुख्य क्षेत्रात चांगले काम होत आहे.लवकरच मागासलेल्या जिल्ह्यांच्या यादीतून उस्मानाबादचे नाव बाहेर निघेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

यावेळी महाराष्ट्र शासनाचे मुखपत्र लोकराज्य हे मासिक घरोघरी पोहोचवून ही मोहिम वृध्दींगत करण्यासाठी 2018-19 या वर्षात योगदान देणाऱ्या  उस्मानाबाद बचतगटाच्या सदस्या श्रीमती. केशरबाई नागनाथ जाधवर व क्रांतीवीर बहुउद्देशीय सामाजिक संस्था, गौर ता.कळंब, जि. उस्मानाबाद यांना  पालक मंत्र्यांच्या हस्ते  सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.तसेच जिल्हा क्रीडा कार्यालयाकडून जिल्हा पातळीवरील युवक-युवती  पुरस्कार शेतकऱ्यासाठी उल्लेखनीय काम करणाऱ्या विनायक हेगाणा, सायली शशिकांत सलगर  यांना रोख रक्कम 10 हजार व गौरव पत्र, सन्मानचिन्ह तसेच संस्था पुरस्कार अंबवा महिला मंडळ यांना रुपये 50 हजार रुपये व गौरवपत्र,सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.त्याचबरोबर जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाने सर्व पशुवैद्यकीय दवाखाने आयएसओ मानांकन मिळवल्याबद्दल जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.नामदेवआघाव यांचाही पालकमंत्री महोदयांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

शेवटी सर्वांनी मिळून आपल्या जिल्ह्याला विकासाच्या वाटेवर यशस्वीपणे नेण्याचा संकल्प करूया असे आवाहन पालकमंत्री श्री.अर्जुन खोतकर यांनी केले. 

यानंतर त्यांनी या समारंभाला उपस्थित असणाऱ्या स्वातंत्र्यसैनिक,लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, पत्रकार व नागरिकांची भेट घेवून शुभेच्छा दिल्या.
 
Top