तुळजापूर (दास पाटील) : 

     शनिवार दि. 11 ऑगस्ट रोजी तुळजापूर तहसिल कार्यालयासमोर आयोजित भारीप बहुजन संघाचे आंदोलन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि आमचा संविधानावर अटळ विश्वास असल्यामुळे आजचे हे आंदोलन स्थगित करत असल्याचे भारीपचे नेते मिलिंद रोकडे यांनी सांगितले. नवी दिल्ली येथे मनुवादी विचारसारणीच्या समाजकंटकांकडून संविधान जाळण्याचा निंदनीय आणि संतापजनक प्रकार घडल्याच्या घटनेचा भारीपने तीव्र निषेध व्यक्त केला आहे. 

निदर्शने, आंदोलने करून त्यातून काही अनुचित प्रकार घडू नयेत, कायदा, सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न उद्भवू नये म्हणून पक्षादेशानुसार हे निदर्शने व आंदोलन मागे घेत असल्याचे पत्र तुळजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र बोकडे यांना भारीप बहुजन महासंघाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी दिले. 

निवेदनात नमूद केले आहे की, संविधान जाळून देशभरात अराजकता, जातीय दंगली घडविण्याचा मनुवादी विचारांच्या लोकांचा डाव आहे. परंतू आमचा संविधानावर अटळ विश्वास आहे. संविधान जाळणाऱ्या समाजविघातक अतिरेक्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, तसेच कठोर कारवाई करावी, यासाठी सरकारला वेळ देत आहोत. म्हणून आजचे हे आंदोलन स्थगित करत आहोत, असे म्हटले आहे. 

यावेळी पोलीस निरीक्षक राजेंद्र बोकडे यांनी भारीप बहुजन महासंघाने हे आंदोलन मागे घेऊन पोलीस यंत्रणेवर ताण पडून यातून कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी प्रशासनाला सहकार्य केले, याबद्दल कौतुक केले. तसेच पक्षाच्या आणि कार्यकर्त्यांच्या भावना वरिष्ठांपर्यंत पोचवण्याचे आश्वासन दिले. 

यावेळी भारीप बहुजन महासंघाचे मिलींद रोकडे, राकेश जेटीथोर, औदुंबर कदम, अमोल जेटीथोर, जीवन कदम, प्रकाश डावरे, ज्ञानेश्वर बनसोडे, राजरत्न कदम, दयानंद कदम, विकास हावळे, अरविंद चंदनशिवे, धम्मशील कदम, कुमार साबळे, रवी साखरे, अजय कांबळे, सुरेश चौधरी, सागर चौगुले, दिनेश साळवे, मनोज धावारे, अमित कदम, आत्मा सोनावणे आदींसह भारीपसह इतर बहुजन संस्था, संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top