"वेध तुळजापूर विधानसभेचे” या विशेष वार्तापत्रामध्ये काँग्रेसकडून कोणत्या युवा चेह-यास संधी दिली जावू शकते? याचा शोध घेत असताना तालुक्याचे पर्मनन्ट आमदार अशी ख्याती असलेल्या आमदार मधुकरराव चव्हाण यांची या मतदार संघावर मजबूत पकड असल्यामुळे त्यांचा वारस म्हणून तथा भावी आमदार म्हणून युवा नेते सुनिल चव्हाण यांचे नाव मागील अनेक वर्षापासून काँग्रेस कार्यकर्त्यांतून चर्चेत आहे. आमदार चव्हाण यांच्या अनुपस्थितीमध्ये युवा नेते सुनिल चव्हाण यांची बहुतांश कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती असते. या अनुषंगाने “तुळजापूर लाईव्ह” ने युवा नेते सुनिल चव्हाण यांच्या कार्याचा घेतलेला आढावा… 



तुळजापूरचे आमदार मधुकरराव चव्हाण हे कामानिमित्त, विधानसभेच्या कामासाठी मुंबईत असताना मतदार संघात राबविण्यात येणा-या योजना, विकास कामे, कार्यकर्त्यांच्या भेटी-गाठी, जनतेच्या अडी-अडचणी सोडविणे, सामान्यांचे गा-हाणे ऐकून त्यावर उपाययोजना करणे, धार्मिक उत्सव, राजकीय कार्यक्रम, दुख:द घटना प्रसंगी सांत्वन करणे, अशा विविध घडामोडी प्रसंगी प्रामुख्याने युवा नेते सुनिल चव्हाण हे आवर्जुन उपस्थित असतात. यामुळे आमदार चव्हाण हे बाहेरगावी गेल्यानंतर तुळजापूर मतदार संघातील सर्वसामान्य जनतेसाठी जवळचे नेतृत्व म्हणजे सुनिल चव्हाण हेच असल्याचे नेहमी निदर्शनास येते.

दि. 30 मार्च रोजी नुकताच त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी त्यांच्या लोकप्रियतेची चुणूक दिसून आली. श्री तुळजाभवानी शेतकरी सहकारी साखर कारखाना परिसरातील मधुशाली हायवे सर्व्हिसेसच्या प्रागंणात अतिशय भव्य दिव्य दिमाखादार अभिष्टचिंतन सोहळा संपन्न झाला. तालुक्यासह परिसरातून व जिल्हयातील अनेक ठिकाणाहून नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, चाहते यांच्यासह सर्वसामान्य नागरिकांनी या कार्यक्रमास हजेरी लावून आपल्या युवा नेत्यास वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. दिवसभरातील या कार्यक्रम दरम्यान उपस्थितांनी सत्कारासाठी आणलेल्या हार व पुष्पगुच्छामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या व युवा नेते सुनिल चव्हाण हेच भावी आमदार होणार अशी प्रतिक्रिया उमटली.

युवा नेते सुनिल चव्हाण हे सध्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक, श्री खंडोबा पणन सहकारी संस्थेचे चेअरमन, श्री कुलस्वामिनी सुतगिरणीचे चेअरमन या पदावर कार्यरत असून यापुर्वी ते भुविकास बँकेचे संचालक, श्री तुळजाभवानी शेतकरी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन या पदावर कार्यरत होते. नुकतेच त्यांनी निवड तुळजापूर येथील जीवन विकास शिक्षण संस्थेच्या सचिवपदी झाली आहे.

या विविध पदावर कार्यरत असल्यामुळे त्यांचा जनसंपर्क वाढला असून जिल्हयातील प्रमुख नेत्यांसोबत त्यांचे जिव्हाळयाचे संबंध आहेत. त्यांची ही राजकीय व सामाजिक कारकीर्द पाहता काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठीकडून विदयमान आमदार मधुकराव चव्हाण यांचे चिरंजीव, युवा चेहरा म्हणून युवा नेते सुनिल चव्हाण यांचा आगामी तुळजापूर विधानसभा निवडणुकीसाठी सर्वप्रथम विचार होवू शकतो व यासाठी तालुक्यातील काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी कंबर कसली आहे.
 
Top