उस्मानाबाद :- अखिल भारतीय मराठी नाटय परिषद उस्मानाबाद व रामकृष्ण परमहंस महाविदयालय यांच्या संयुक्त विदयमाने उस्मानाबाद येथे दि. 7 ते 9 सप्टेंबर या कालावधीत राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती नाष्टयपरिषदेचे उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष विशाल शिंगाडे यांनी पत्रकाद्वारे दिली.
उस्मानाबाद येथे नुकतेच 97 वे अखिल भारतीय मराठी नाटय संमेलन यशस्वीपणे पार पडले. त्यातून प्रेरणा घेवून युवकामध्ये नाटय चळवळ वृध्दीगंत होत आहे. या नवयुवकांना आपल्या कलेच्या सादरीकरणाला संधी उपलब्ध करुन देण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाटय परिषदेच्या उस्मानाबाद शाखेच्यावतीने राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. सदरील स्पर्धा दि. 7 ते 9 सप्टेंबर या कालावधीत संपन्न होणार आहे. या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी प्रवेश फी अडीच हजार रुपये ठेवण्यात आले आहे.
स्पर्धेत प्रथम येणा-या विजेत्यास 51 हजार रुपये पारितोषिक, द्वितीय पारितोषिक 31 हजार रुपये, तृतीय पारितोषिक 11 हजार रुपये, तर उत्तेजनार्थ एकांकिका म्हणून 5 हजार रुपये पारितोषिक देण्यात येणार आहे. त्याचबरोबर उत्कृष्ट कलाकार, उत्कृष्ट संहिता लेखन, उत्कृष्ट दिग्दर्शन, उत्कृष्ट पार्श्वसंगित, उत्कृष्ट प्रकाश योजना यासाठीही रोख रक्कमेचे पारितोषिक देण्यात येणार आहे.
तरी या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन उस्मानाबादचे नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, प्रमुख कार्यवाह धनंजय शिंगाडे, उस्मानाबाद नाष्टयपरिषदेचे अध्यक्ष विशाल शिंगाडे, रामकृष्ण परमहंस महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख, प्रमुख सल्लागार डॉ. अभय शहापूरकर, उपाध्यक्ष राजेंद्र अत्रे, डी.जे. कुलकर्णी, सागर चव्हाण, वर्षाराणी कुदळे आदींनी केले आहे.