नळदुर्ग :- 9 ऑगस्ट क्रांतीदिनी मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली. त्या पार्श्वभूमीवर राज्यमार्गावरील व तुळजापूर तालुक्यातील गंधोरा पाटी येथे परिसरातील दहा ते बारा गावातील सकल मराठा बांधवानी चक्काजाम करुन दोन तास रास्ता रोको आंदोलन केला. दरम्यान तुळजापूर येथे कॉग्रेसच्या धरणे आंदोलनात सहभागी होण्यासाठी तुळजापूर कडे जाणा-या आमदार मधुकरराव चव्हाण यांना आंदोलकांनी सकाळी साडे दहा वाजता पुढे जाण्यास रोखल्याने त्यांना माघार घ्यावी लागली.
तुळजापूर तालुक्यातील गंधोरा पाटी या ठिकाणी गुरुवार दि. 9 ऑगस्ट रोजी सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास राज्यमार्गावर चक्काजाम करुन रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी अनेकांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे याबाबत शासन विरोधात रोष व्यक्त केला. दरम्यान, जि.प. सदस्य महेंद्र धुरगुडे यांनी या आंदोलनात सहभागी होवून मार्गदर्शन केले. यावेळी धुरगुडे यांनी मराठा समाजातील हुशार विदयार्थ्यांचे उदाहरण देवून आरक्षणविना होणा-या कुंचबनेबाबत मत व्यक्त केले व शिक्षण, नौकरीत आरक्षण देण्यात यावे, राजकीय आरक्षणाबाबत मराठा समाज सक्षम आहे. तसेच आंदोलनात चुकीच्या व्यक्ती घुसून मराठा समाजाला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यासाठी ॲट्रासिटी, कोपर्डी या विषयाच्या माध्यमातून मुळ विषय असलेल्या आरक्षणाच्या लढयापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करत आहेत, तो हाणून पाडण्यासाठी आपण आरक्षणाच्या एकमेव मुद्दयावर एकत्र येण्याचे सांगून पोलिसांनाही शांततेत होणा-या आंदोलनास सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
आंदोलन सुरु असताना तुळजापूर कडे जात असलेल्या आमदार मधुकरराव चव्हाण यांनी भेट देवून आपला पाठिंबा देवून उपस्थित आंदोलकांसमोर बोलताना म्हणाले की, तरुणांनो आत्महत्या करु नका, असे आवाहन करत मराठा आरक्षणासाठी आम्हीही प्रयत्नशील आहोत, आरक्षण मागणीसाठी शांततेत आंदोलन करण्याचे सांगून शासन आरक्षण देण्यासाठी दिरंगाई करीत असल्याची टीका केली. दरम्यान, तुळजापूरकडे जाण्यास त्यांना आंदोलकांनी रोखल्याने त्यांना नालाईजाने परत फिरावे लागले.
या रास्ता रोको आंदोलनात तुळजापूर तालुक्यातील गंधोरा, किलज, देवसिंगा तुळ, वडगाव देव, मानेवाडी, बसवंतवाडी, सलगरा दिवटी, बोरनदवाडी, चिकुंद्रा या गावातून बाबुराव भोसले, श्रीहरी लोमटे, साहेबराव जाधव, प्रशांत लोमटे, प्रशांत पाटील, प्रभाकर भोसले, संतोष भोसले, संजय भोसले, रमेश जांभळे, बिभिषण भोसले, विदयासागर देसाई, रमाकांत गायकवाड, शरणाप्पा कबाडे यांच्यासह शेकडो मराठा बांधव सहभागी झाले होते. यावेळी नळदुर्ग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर राडकर यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.
आंदोलनादरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजूस परप्रांतात जाणा-या सर्वाधिक वाहनांची मोठी रांग लागली होती. आक्रमक आंदोलकानी यावेळी आ. मधुकरराव चव्हाण यांना रोखले यामुळे चव्हाण यांना माघार घ्यावी लागली. मात्र काही वेळाने तुळजापूरकडून येणा-या रुग्ण्वाहिकेस सामाजिक भान जपत आंदोलकानी रस्ता मोकळा करुन दिला.