नळदुर्ग :- महिलांच्या संरक्षणासाठी अनेक महत्वाचे कायदे अस्तित्वात महिलांनी त्या कायदयाचा अभ्यास करावे व समाजकारण, राजकारण करत असताना येणाऱ्या अडचणीवर मात करून गावकारभारात सक्रिय पुढाकार घेतला पाहिजे, असे प्रतिपादन महिला राजसत्ता आंदोलनाच्या मराठवाडा विभागीय समन्वयक मिनाक्षी बिराजदार यांनी नळदुर्ग येथे आयोजित जिल्हास्तरीय कायदे विषयक प्रशिक्षण कार्यशाळेत केले.
महाराष्ट्र राज्य महिला आयोग मुंबई, आर.एस.सी.डी. मुंबई, महिला राजसत्ता आंदोलन मुंबई, परिवर्तन सामाजिक संस्था नळदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने नळदुर्ग येथे कारभारणी प्रशिक्षण अभियानातंर्गत महिला लोकप्रतिनिधीसाठी जिल्हास्तरीय कायदे विषयक प्रशिक्षण संपन्न झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ॲड. ज्योती बडेकर-माळाळे यांनी कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंध अधिनियम २००५. चा कायदा, लैगिक अत्याचार विरोधी अधिनियम २०१३ व अन्य महिला संबंधी विविध कायदयाची माहिती दिली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गुजनूर गावच्या सरपंच सौ. सुवर्णा व्यंकट साळूंके या होत्या. प्रारंभी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक परिवर्तनचे सचिव मारूती बनसोडे यांनी केले. यावेळी गुळहळळीच्या सरपंच मिरा घोडके, शहापुरच्या सरपंच उर्मिला धोंगडे, वागदरीच्या ग्रा.पं. सदस्या विदया बिराजदार यांच्यासह महिला सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य महिला, एस.के. गायकवाड, भैरवनाथ कानडे आदीजण उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जयश्री बिराजदार, भाग्यश्री माने, जनाबाई काळे यांनी पुढाकार घेतला.
![]() |