तुळजापूर (दास पाटील) :- 

तुळजापूर येथील उप-जिल्हा रुग्णालयाची दुरावस्था, रुग्णांची हेळसांड या प्रश्नांवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी प्रहार जनशक्ती पक्षाने केली आहे.  पक्षाच्या वतीने दि. १८ रोजी तहसिलदार, तुळजापूर मार्फत जिल्हयाचे पालकमंत्री अर्जूनराव खोतकर यांना निवेदन देण्यांत आले असून यावर तात्काळ कारवाई न झाल्यास प्रहार स्टाईल आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. 

निवेदनात नमूद केले आहे की, तुळजापूर शहर हे तालुक्याचे ठिकाण असूनही येथील उप-जिल्हा रुग्णालय हे विनाकामाचा दवाखाना झाला आहे. या रुग्णालयामध्ये कोणत्याही प्रकारची सोय होत नाही. त्यामुळे गोरगरीब नागरिकांना खाजगी दवाखान्याचा आधार घेऊन उपचार घ्यावा लागतो.  या दवाखान्याची नवीन ईमारतीस भेगा पडल्या आहेत. त्यामुळे रुग्णांचा जीव धोक्यात येऊ शकतो पावसाळयाचे दिवसात दुषीत पाण्यामुळे विविध आजार उद्भवतात. शासनाने लाखो रुपये खर्च करुन रुग्णांना शुध्द पाणी मिळावे, यासाठी पाण्याचे फिल्टर बसविलेले आहेत. परंतु अनेक महिन्यांपासून झाले हे फिल्टर बंद आहेत. पिण्याचे पाणी हे बाहेर ठेवलेल्या टाकीतुन प्यावे लागते. यामुळे रुग्ण हे उप-जिल्हा रुग्णालय तुळजापूर येथे उपचारासाठी येतात की, आणखी पुन्हा आजारी पडण्यासाठी ? हा प्रश्न निर्माण होत आहे.  

दवाखान्यात औषधांचा मोठया प्रमाणात तुटवडा आहे. तो तुटवडा तात्काळ भरुन काढावा, शासन निर्णय दि. १७/१०/२०१७ नुसार उप-जिल्हा रुग्णालयात अपंग प्रमाणपत्राचे वाटप करावे असा आदेश आहे. त्याप्रमाणे सदर आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी, दवाखान्यात पिण्यासाठी शुध्द पाणी उपलब्ध करून द्यावे,  कर्तव्यकाळात दवाखान्यातील डॉक्टर्स व कर्मचारीवर्गाने कोणत्याही कारणास्तव बाहेर जाऊ नये, दवाखान्याच्या ईमारतीस पडलेले तडे तात्काळ दुरुस्त करण्यात यावे व संबंधीत ठेकेदारावर कारवाई करण्यांत यावी. सदरच्या मागण्या तात्काळ पूर्ण कराव्यात अन्यथा प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने दि. ४ सप्टेंबर  रोजी एक दिवसाचे धरणे आंदोलन करण्यात येईल. धरणे आंदोलनानंतर मागण्यांचा विचार न झाल्यास प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने प्रहार स्टाईलने आंदोलन करण्यांत येईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आलाआहे. निवेदनावर प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष केदार सौदागर, तालुकाध्यक्ष शशिकांत मुळे, अमीर शेख, महादेव चोपदार, मारुती पाटील, नागेश कुलकर्णी, प्रणव निकते, संतराम जाधव, कृष्णा सावंत सुनिल शिंदे, प्रशांत भांजी इत्यादींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

 
Top