तुळजापूर :- कृष्णा - मराठवाडा सिंचन योजनेतील टप्पा क्रं.2 मधील पांगरदरवाडी ते सिंदफळ व सिंदफळ ते रामदरा कालव्यासाठी संपादित करण्यात आलेल्या शेतजमिनीचा मावेजा योग्य दराने तातडीने देण्याची मागणी आ. चव्हाण यांनी केली. बाधित 164 शेतकऱ्यांच्या शेतजमीनीचा मावेजा देण्यासाठी रु.9 कोटी 12 लक्ष रुपये उपलब्ध करुन दिल्याचे आ.चव्हाण यांनी सांगितले ते कालव्यासाठी संपादित जमिनीच्या मावेजाबाबत शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेण्याच्या बैठकीत दि.1 ऑगस्ट सर्किट हाऊस तुळजापूर येथे बोलत होते.
यावेळी त्यांचे समवेत भूसंपादन अधिकारी (मांजरा प्रकल्प) श्री.यादव, कृष्णा मराठवाडा बांधकाम -1 चे कार्यकारी अभियंता श्री.घुगे,भूमि अभिलेख विभागाचे डोईफोडे नायब तहसीलदार श्रीमती कन्हेरे,उपअभियंता आर.जी.पाटील, जि.प.चे माजी अध्यक्ष धिरज पाटील,सभापती शिवाजी गायकवाड यांचेसह सिंदफळ,सांगवी मा.,दहिवडी,पांगरदरवाडी,मसला खु. येथील बाधीत शेतकरी उपस्थित होते.
पुढे बोलताना आ.चव्हाण म्हणाले की, या कालवा टप्पा क्रं.4 व 5 मधील बाधीत शेतकऱ्यांच्या जमीनीचे मोजमाप व्यवस्थीत व्हावे,शेतकऱ्यांच्या झाडे,फळझाडे,पाईपलाईन किंवा संपादित केलेल्या सर्व बाबींचा मावेजा देण्यात यावा. त्याचबरोबर 2011-12 मध्ये हे काम झालेले असल्याने त्यांच्या पिकांची नुकसानभरपाई सुध्दा देण्यात यावी. तसेच मावेजा वाटपासाठी तुळजापूर विश्रामगृह येथे तीन दिवस कॅप लावून मावेजा वाटप करण्यात यावा. तसेच याबाबतीत कोणत्याही शेतकऱ्याची अडचण अथवा हरकत असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात संबंधिताकडे तक्रार करावी. यावेळी शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना अधिकाऱ्यानी समर्पक उत्तरे दिली कार्यक्रमाची प्रस्तावना श्री घुगे यानी केली तर मार्गदर्शन आ.चव्हाण,भूसंपादन अधिकारी यादव यांनी केले.