नळदुर्ग :- शहरात पंतप्रधान आवास योजना राबविण्यात नगरपालिका दिरंगाई करीत आहे. सन 2008 मध्ये नळदुर्ग शहरासाठी शासनाने मंजूर केलेली घरकुल योजना नगरपरिषदेच्या भ्रष्ट कारभारामुळे बासनात गुंडाळली गेली. शहरवासियांना पंतप्रधान घरकुल योजनेची मोठी आशा आहे. मात्र नगरपरिषदेचा निष्क्रिय कारभार शहरा पंतप्रधान घरकुल योजना राबविण्यात अडसर ठरत आहे.
पंतप्रधान आवास योजना नळदुर्ग शहरात राबविली गेली तर शहरातील पात्र व गरीब नागरिकांना त्यांच्या हक्काचे घर मिळू शकेल. काही महिन्यापूर्वी राष्ट्रवादीचे नेते अशोक जगदाळे यांनी शहरात नगरपरिषदेच्या माध्यमातून पंतप्रधान आवास योजना राबवून पहिल्या टप्प्यात चारशे घरे बांधणार असल्याचे म्हटले होते.
मात्र त्यांचे हे आश्वासन केवळ आश्वासनच राहिले. कारण अनेक महिने उलटून गेले तरी शहरात पंतप्रधान आवास योजनेच्या कामास सुरुवात झालेली नाही. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात एकही कुटूंब घराविना राहणार नाही, असे जाहिर केले आहे. असे असताना आज नळदुर्ग शहरासह अनेक ठिकाणी पंतप्रधान आवास योजना राबविण्यात मोठी दिरंगाई होत आहे. त्यामुळे पात्र असूनही अनेक नागरिक पंतप्रधान आवास योजनेंतर्गत मिळणा-या घरापासून वंचित राहिले आहेत. नळदुर्ग शहरात पंतप्रधान आवास योजना राबविण्याच्या कामास गती मिळण्याची गरज आहे. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अशोक जगदाळे यांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
सन 2008 मध्ये शासनाकडून तब्बल 22 कोटी रुपये खर्चाची 1260 घरांची घरकुल योजना मंजूर झाली होती. यासाठी पहिल्या टप्प्याचा निधी 10 कोटी रुपये नगरपरिषदेला प्राप्त झाले होते. मात्र नगरपरिषदेच्या भ्रष्ट कारभारामुळे शासनाचे दहा कोटी रुपये खर्च होऊनही दहा वर्षात शहरातील एकही लाभार्थीला या योजनेंतर्गत घर मिळाले नाही. त्यामुळे शहरातील पात्र लाभार्थी त्यांच्या हक्काचे घर मिळण्यासाठी नळदुर्ग नगपरिषदेने पंतप्रधान आवास योजना राबविणे गरजेचे आहे.
- विलास येडगे, नळदुर्ग