करमाळा :- उंदरगाव ता. करमाळा (जि. सोलापूर) येथे अखेर बिबटयास पिंज-यात जेरबंद करण्यास यश आले असून रविवार रोजी दुपारी वनविभागाच्या कर्मचा-यांनी बिबटयास घेवून मोहोळ कडे रवाना झाले. साधारणतः दोन महिन्यापुर्वी बिबट्याचा वावर आढळून येत होता. याबाबत अनेकांना वस्त्यांवर दिसला होता. दबा धरून बसलेल्या या बिबट्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

     उंदरगांव, मांजरगांव, वाशिंबे परिसरातील शेतकऱ्यांना रात्री अपरात्री शेतात जावे लागते या भागात असलेले ऊसाचे क्षेत्र यामुळे बिबटयाचा अंदाज बांधणे कठीण होत होते. अनेकांना तो दिसला परंतु याबाबत खात्री वाटत नव्हती.काही ठिकाणी दिसलेले बिबट्याचे ठसे,याबाबत वन विभागाच्या पाहणी पथकाने भेट देऊन ठसे पाहिले तसेच खात्री केल्यानंतर सापळे रचुन त्याला पकडण्यासाठी कंबर कसली.



   मूळचे वाशिंबे येथील विश्व हिंदू परिषदेचे संघटन मंत्री संतोष वाळुंजकर यांनी वनमंत्री यांना फोनवरून सत्य परिस्थिती सांगितली व वनमंत्री यांनी संबंधित अधिकारी यांना या भागात जास्तीचे पिंजरे लावण्याची सूचना केली.वनविभागाने ही लागलीच पिंजरे बसवले.

    मगर वस्ती,उंदरगांव येथील चंद्रकांत कुंभार यांच्या शेताच्या परिसरामध्ये दोन दिवसापुर्वी वन विभागाने पिंजरा लावला व रविवार रोजी पहाटेपूर्वी बिबटया अखेर पिंजऱ्यामध्ये आला. नर बिबटया जरी जेरबंद झाला तरी दोन पिल्ले डांबरी रस्त्यावर नागरिकांनी पाहिलेली आहेत यामुळे भितीचे सावट मनामध्ये घर करूनच आहे. 

     बिबट्या मानवी वस्ती किंवा शहरात शिरल्याच्या घटना यापूर्वीही घडलेल्या आहेत. किंबहुना त्या वाढतच आहेत. त्यामुळेच बिबट्याची मानवी वस्तीकडील धाव रोखण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेसह नागरिकांनीदेखील पुरेशी सजगता दाखविण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी विविध उपाययोजना केलेल्या असल्या, तरी पुरेशी दक्षता घेणेदेखील अनिवार्य झाले आहे. 

बिबट्या मानवी वस्तीकडे येणे, शेतात लपून बसणे, गावातील शेळ्या, तसेच मेंढ्याची शिकार करणे, लहान मुलांना उचलून नेणे, धुमाकूळ घालणे असे अनेक प्रकार अलीकडे सातत्याने होत आहेत. जंगलांचा परिसर विरळ होणे, तसेच बिबट्यांचा अधिवास नष्ट होणे यांसारख्या प्रकारांमुळे बिबट्यांमध्ये असुरक्षिततेची भावना आहे. यामुळेच बिबटे सैरभैर होताना दिसतात. याचा फटका मानवी वसाहतींना बसत आहे. 

प्रतिक्रिया :- 
संतोस वाळुंजकर, विश्व हिंदू परिषद संघटन मंत्री सोलापूर :
आम्ही वनमंत्री यांना माहिती सांगीतली.त्यांनी संबंधित अधिकारी यांना जास्तीचे पिंजरे लावण्यास आदेश दिले.व या भागात जास्तीचे पिंजरे बसवले व त्यामुळे हा बिबट्या सापडण्यास मदत झाली.याकामी अनेकांचे सहकार्य लाभले.

महेश कुलकर्णी, शेतकरी, उंदरगांव :
दोन महिन्यापासुन बिबट्या आल्याची चर्चा सुरू होती काहींनी पाहिला हि होता , या चर्चामुळे परिसरामध्ये भितीचे वातावरण पसरले होते, शाळेतुन घरी मुलं येत असताना जीव मुठीत घेऊन येत होती, शेळया-मेंढयासह, लहान मुलांची काळजी जास्तच वाटत होती. पकडल्यानंतर सुटकेचा निश्वास वाटला, परंतु यापुढेही वन विभागाने गांभिर्याने, सतर्कपणे लक्ष देणे आवश्यक आहे 

व्ही .एस . खार तोडे वन परिमंडल अधिकारी, मोहोळ ( वन विभाग ) :
परिसरातील शेतकऱ्यांनी बिबट्या पाहिल्याचे वन विभागाकडे कळविल्यानंतर आमच्या पथकाने  परिसराची पाहणी केली, ठस्याची तपासणी हि केली, या गोष्टीचे गांभिर्य पाहुन आम्ही पिंजरा लावला व बिबटयाला जेरबंद केले.
 
Top