काटी :- तुळजापूर तालुक्यातील सावरगाव येथील श्री. नागनाथ यात्रेस शनिवार दि. 11 ऑगस्ट रोजी धार्मिक कार्यक्रमाने उत्साहात सुरुवात झाली आहे. या यात्रेत येणाऱ्या भाविकांची सोय व्हावी, यासाठी सावरगाव ग्रामपंचायतच्या वतीने मंदीर परिसरात व गावातील एकूण दहा हायमास्ट लॅम्प बसवले आहे. तुळजापूर पंचायत समितीचे माजी सभापती संतोष बोबडे, विद्यमान सरपंच रामेश्वर तोडकरी, उपसरपंच आनंद बोबडे यांच्या हस्ते हायमास्ट लॅम्पचे लोकार्पण करण्यात आले. या पथ दिव्याच्या उजेडामुळे गाव प्रकाशमय झाले असून भाविकांसह ग्रामस्थातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
नागपंचमीपर्यंत सलग पाच दिवस असणाऱ्या या यात्रोत्सवानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सावरगाव येथील या यात्रेत नाग, पाल, व विंचू हे परस्परांचे कट्टर हाडवैरी असणारे उभयचर प्राणी एकत्र येतात, हे या यात्रेचे मुख्य वैशिष्टय़ आहे. सावरगावसह पंचक्रोशीतील भाविक मोठय़ा भक्तीभावाने या यात्रेत सहभागी होऊन श्री नागोबाचे दर्शन घेतात.
यावेळी माजी उपसभापती विलास डोलारे, प्रमोद माने, प्रताप माने, अरविंद भडंगे, बाळासाहेब डोके, पंढरी डोके, भागवत डोलारे, अमोल माने, प्रदिप मगर, नागेश मगर, पांडुरंग हागरे, अशोक माळी, डी. एस. माळी, महेश मगर, धनाजी डोलारे, अंकुश वाकळे, अतुल वाकळे, अविनाश माने यांच्यासह ग्रामपंचायतचे आजी-माजी पदाधिकारी, ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते.