तुळजापूर :- पिंपळा खुर्द ता. तुळजापूर येथील जिल्हा परिषद शाळेतील विदयार्थिनीनी भारत भूमीच्या रक्षणासाठी कर्तव्य बजावत असलेल्या सैनिकांसाठी राख्या पाठवून त्यांच्या प्रति बंधूभावाची जोपासना केली आहे. देशाचे रक्षण करणाऱ्या भाऊरायांना रक्षाबंधना निमित्त शाळेतील 30 विदयार्थिनीनी स्वतः 120 राख्या तयार करुन शुक्रवार दि. 10 ऑगस्ट रोजी तुळजापूर पोस्टातून सीमेवर पाठवल्या आहेत. स्तुत्य उपक्रम राबविल्याबद्दल विदयार्थिनी व शिक्षकांचे कौतुक होत आहे.
भारतीय संस्कृतीत रक्षाबंधन या सणाला बहीण भावाच्या पवित्र व अतूट प्रेमाचे प्रतीक मानले जाते .शाळेने राबवलेल्या अनोख्या उपक्रमामुळे शाळा लष्कराच्या आदरास पात्र ठरली आहे. राखीपौर्णिमा आली की भावाला बहिणीच्या राखीची ओढ लागते. सीमेवरील जवानाला राखी पौर्णिमेला आपले मनगट सुने सुने वाटू नये. या धाग्यांनी राखी पौर्णिमा साजरी व्हावी. तसेच शाळेतील या छोट्या भगिनींच्या धाग्याने त्यांचे मनगट शोभून दिसेल तसेच बहिणींचे हेे अनोखे प्रेम त्यांच्या मनगटात बळ निर्माण करील या हेतूने याचे आयोजन झाले .याबरोबरच मनाला उभारी देणाऱ्या शुभेच्छा ही दिल्या आहेत . देशातील भगिनी व संपूर्ण देश तुमच्या सोबत आहे. डोळ्यात तेल घालून अहोरात्र सीमेचे रक्षण करणाऱ्या सैनिकास आम्ही सलाम करतो. आपण भारतमातेचे रक्षण करता हे देशसेवेचे पवित्र कार्य आपणाकडून अविरत घडत राहो अशा शुभेच्छा ही मुलींनी सैनिकांना दिल्या आहेत.
राखी तयार करण्याचे साहित्य खरेदी केले व ते तयार करण्याचे कौशल्य प्रात्यक्षिका द्वारे मुलांना दाखवले. त्यानंतर मुलींनी आपली कल्पकता वापरून सुबक व आकर्षक राख्या तयार केल्या . यासाठी काचेचे मणी व इतर साहित्य वापरून पर्यावरण संवर्धनासाठी प्लास्टिक वापराला ही छेद दिला. तसेच या कारक कौशल्याने निर्मितीचा आनंद ही मुलांना घेता आला. देशसेवेचे रक्षण करणाऱ्या जवानांप्रती प्रेमभाव ही याने जपता आला व मुलींच्या चेहऱ्यावरील आनंद व समाधान ही याची फलिते आहेत, असे श्रीमती निकते यांनी सांगून सर्व मुलींचे त्यांनी कौतुक केले.
याकामी देविदास गायकवाड, विठ्ठल नरवडे, शिवाजी वेदपाठक, पांडुरंग जावळे, मनोज पाटील , प्रशांत वैदकर, बाळू मुंडे, गुणवंत चव्हाण , माधव मोरे , अंजली निकते यांचे सहकार्य लाभले.