नळदुर्ग :- होवू घातलेल्या गणेशोत्सव व मोहरम सणाच्या पार्श्वभूमीवर नळदुर्ग पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था, शांतता अबाधित राखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून 326 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांनी दिली.
नळदुर्ग शहर पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या 65 गावांपैकी 32 गावामध्ये एक गाव एक गणपती ही संकल्पना राबविण्यात येत आहे. त्याचबरोबर आतापर्यंत 40 गणेश मंडळांना ऑनलाईन परवाना देण्यात आला आहे. 65 गावांमध्ये 142 गणेश मंडळे, 91 पंजे ढोले आहेत. नळदुर्ग पोलीस ठाण्यांतर्गत काटगाव, इटकळ, निलेगाव, नळदुर्ग, आरबळी, उमरगा चिवरी, हंगरगा नळ, सलगरा दिवटी, अणदूर हे गावे संवेदनशील असून या गावात पोलीसांचा विशेष तगडा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.
हे उत्सव शांततेत साजरा होण्यासाठी व अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून 326 जणांवर केलेल्या कारवाईपैकी 260 लोकांवर कलम 107 प्रमाणे कारवाई केली तर कलम 144 प्रमाणे 64 आरोपींना शहरातून हद्दपारीची कारवाई केली आहे. तर महाराष्ट्र गुंड विरोधी कायदयानुसार दोघांवर जिल्हा हद्दपारीची कारवाई करण्यात आली.