तुळजापूर : कुमार नाईकवाडी
शुक्रवार दि. १४ सप्टेंबर रोजी तुळजापूर येथील तुळजाभवानी महाविद्यालयात हिंदी विभागातर्फे हिंदी दिवस मोठ्या उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी तुतारी भित्तीपञिकेचे प्रकाशनही प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. बेटी बचाओ बेटी पढाओ हे ब्रिद घेऊन हिंदी दिना निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी प्रमुख वक्ते म्हणून उस्मानाबादच्या रामकृष्ण महाविदयालयाचे प्रा. श्रीराम नागरगोजे बोलताना म्हणाले की, भाषेमुळे देशाची अस्मिता अबाधित राहते. त्याचप्रमाणे आपल्या लेकीसुध्दा संस्कृतीचे जतन करत असतात. मुलींशिवाय परिवारास पूर्णत्व प्राप्त होत नाही. समाजातील संवेदनशील विषय देशपातळीवर नेऊन त्या विषयावर हिंदी भाषेतच उपाय शोधण्याचे काम प्रभाविपणे होऊ शकते.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. एस.एम. मणेर म्हणाले की, भाषा समाजातील भेद कमी करुन समाजाला व देशाला एकसंघ करत असते. महाराष्ट्रातील थोर संत नामदेवांनी सुध्दा हिंदी भाषेतुन आपल्या भक्ति साहित्याचा प्रचार केला. हिंदी देशातील सर्वात मोठी संपर्क भाषा आहे. राष्ट्रीय प्रतिकांचे महत्व जाणून घेण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली.
कार्यक्रमाचे सूञसंचलन प्रा.डॉ. मंञी आडे यांनी तर प्रास्ताविक प्रा. विवेकानंद चव्हाण यांनी केले. या प्रसंगी डॉ. बारबोले, डॉ. शेतसंदी, डॉ. देशमुख, प्रा. नगरे यांचे अनमोल सहकार्य लाभले. कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रा. आशपाक आतार यांनी मानले.
