तुळजापूर : दास पाटील
७० वा मराठवाडा मुक्ती संग्राम दिन तुळजापूर शहरासह तालुक्यात उत्साहात साजरा करण्यात आला. विविध नगरपरिषद, तहसील कार्यालय, पोलीस ठाणे यासह शासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये, सामाजिक संस्था येथे ध्वजारोहण करण्यात आले. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त शहरात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
तहसील कार्यालय तुळजापूर येथे तहसीलदार दिनेश झांपले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी आ. मधुकरराव चव्हाण, माजी आमदार नरेंद्र बोरगावकर, गोकुळतात्या शिंदे यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती होती.
नगरपरिषद तुळजापूर येथे नगराध्यक्ष चंद्रकांत कणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी मुख्याधिकारी आशिष लोकरे, नगरसेवक पंडीतराव जगदाळे, विजय कंदले, किशोर साठे, औदुंबर कदम यांच्यासह पालिका कर्मचारी नितीन इजाते, महादेव सोनार, भारत साळुंके, अविनाश काटकर, ज्ञानोबा टिंगरे, खालिद सिद्धीकी, एम.आय.शेख आदींची उपस्थिती होती.
सत्ताधारी नगरसेवकांपैकी अध्यक्ष आणि तीन नगरसेवक वगळता सत्ताधारी नगरसेवकांची अनुपस्थिती होती. विरोधी कांग्रेसच्या पाच नगरसेवक, नगरसेविकांनी ध्वजारोहण समारंभाकडे पाठ फिरवली. भाजप पुरस्कृत नगरसेविका अपर्णा नाईक याही अनुपस्थित होत्या. या समारंभास सत्ताधारी आणि विरोधकांपैकी एकही महिला सदस्य उपस्थित नव्हती.
मुक्ती संग्राम दिनाच्या महत्वपूर्ण समारंभाकडे बहुतांश पालिका सदस्यांनी पाठ फिरविल्याने याची चर्चा रंगली आहे. ज्या हुतात्म्यांच्या बलिदानाने मराठवाड्याला स्वातंत्र्य प्राप्त झाले, त्यांचा विसर नगरसेवकांना पडल्याने यावर नागरिक आपली नाराजी व्यक्त करत आहेत.
उपविभागीय पोलीस कार्यालयात उप पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले. तसेच पोलीस ठाणे तुळजापूर येथे पोलीस निरीक्षक राजेंद्र बोकडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

