मुरूम :
केवळ 12 ते 15 कोटी रुपयांच्या कर्ज परत फेडीसाठी किल्लारी सहकारी साखर कारखाना भाडेतत्त्वावर देणे योग्य नसून कारखान्याच्या प्रगतीसाठी तसेच शेतकरी सभासदांच्या हितासाठी या कारखान्यावर लोकनियुक्त संचालक मंडळ स्थापन होणे गरजेचे आहे.शासनाने शेतकरी सभासदांचे हित डोळ्यासमोर ठेवून किल्लारी साखर कारखान्याची निवडणूक घेण्याची मागणी औसाचे आ बसवराज पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली.
मुरुम ता. उमरगा येथील विठ्ठलसाई साखर कारखान्याचा बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभ शुक्रवार (दि 21) रोजी कारखान्याचे चेअरमन आ बसवराज पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला. या निमित्त हंगाम 18- 19 बाबत माहिती देण्यासाठी आ पाटील यांनी कारखाना कार्यस्थळावर पत्रकार परिषद घेतली.यावेळी व्हा चेअरमन सादिकमियाँ काझी,जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष बापूराव पाटील,युवा नेते शरण पाटील,जेष्ठ संचालक रामकृष्ण खरोसेकर,विठ्ठलराव बदोले,शरणाप्पा पत्रिके,माणिक राठोड, शिवलिंगप्पा माळी,कार्यकारी संचालक एम बी अथणी,जि प सदस्य रफिक तांबोळी,दत्ता चटगे,माजी नगराध्यक्ष प्रदीप दिंडेगावे,सुधीर अंबर,उपनगराध्यक्ष संतोष चिलोबा,श्रीकांत बेंडकाळे आदींची उपस्थिती होती.
किल्लारी कारखाना हा सर्वात जुना असून या कारखान्यावर दोन जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे हीत अवलंबून आहे.आपल्या कार्यकाळात या कारखान्यावरील 40 कोटी रुपयांच्या कर्जाची परतफेड करण्यात आली.उर्वरित 12 ते 15 कोटी रुपयांच्या कर्जाची परतफेड करण्यासाठी हा कारखाना दीर्घमुदतीवर भाडेतत्त्वावर देणे योग्य नाही.या करारामुळे कारखान्याची अधोगतीच होणार असल्याचे सांगत कारखान्याच्या प्रगतीसाठी तसेच शेतकरी सभासदांच्या हितासाठी औसा मतदार संघातील किल्लारी कारखान्याच्या संचालक मंडळाची निवडणूक घेण्याची मागणी आ पाटील यांनी केली.तसेच चालू गळीत हंगाम यशस्वी रित्यापार पाडण्यासाठी विठ्ठलसाई कारखाना सज्ज असून या वर्षी 5 लाख मे टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून तोडणी,वाहतुकीचे करार करण्यात आले असल्याची माहिती दिली.या वेळी उपस्थित पत्रकारांनी ऊस दरा बाबत विचारलेल्या प्रश्नांवर उत्तर देताना ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊसाला चांगला भाव देण्यासाठी इथेनॉल निर्मिती सारखे प्रकल्प उभे करणे विचाराधीन असल्याचे सांगत चालूवर्षी ऊस पुरवठा करणाऱ्या सभासदांना साखर उताऱ्या नुसार एफआरपी प्रमाणे भाव देण्यात येणार असल्याचे सांगितले.तसेच शेतकरी सभासदांनी आपल्या व कारखान्याच्या हितासाठी चांगल्या प्रतीचा परिपक्व ऊस गळपासाठी कारखान्यास देऊन सहकार्य करावे असे आवाहन केले.
