सांगली : राजेश पाटील
'अरे खोप्यामंदी खोपा सुगरणीचा चांगला,
एका पिलासाठी तिने झोका झाडाले टांगला.........'
प्रसिद्ध कवियत्री बहिणाबाई च्या या ओळींनी डोळ्यासमोर चित्र उभे राहते ते झाडाला टांगलेल्या घरट्याकडे .इवलेसे पक्षी परिसरातून पालापाचोळा, गवताच्या काड्या, काट्या-कुट्याची जमावजमव करून आपल्या पिलांसाठी घरटे बांधतात.कष्टातून विणलेली अपार प्रीत साकारते ती या घरट्याच्या रूपाने. अल्पावधीतच झाडाला हा तिचा 'झुलता बंगला' वाऱ्याच्या हिंदोळ्यावर माया-ममतेचे ,वात्सल्याचे मग झोके झुलु लागतात.यातून एक नवं विश्व आकारास येते.हळूहळू या इवल्याशा घरात घरपण नांदू लागत.हवेत झुलणाऱ्या इवल्याशा त्या अंगणात भक्ती-भावाचं शिंपण सुरू होतं की जेणेकरून यात दुःखाचे डोंगर नष्ट करण्यासाठी एक प्रयत्न सुरू होतो.वाऱ्याच्या हिंदोळ्यावर झुलणाऱ्या या घरात अल्पावधीतच घरपण खेळू लागतं.या घरट्यातून आभाळाकडे पाहून आपल्या जन्मदात्रीकडे कुतूहलाने पाहणारे इवलेशे डोळे किलकीलू लागतात.त्यांची आई सुगरण मात्र वास्तव जगातील चालणाऱ्या घडामोडींची दरवाजावर बसून जणू कल्पनाच देत असल्याचे भासते.पिता मात्र आपली सुगरण व पिलांच्या पोटाची तजवीज करण्यासाठी कधी उंच आकाशात तर कधी जमिनीवर राहून धडपडताना दिसतो. तो जरी उंच आकाशात गगनभरारी घेत असला तरी त्यांचे संपूर्ण लक्ष मात्र आपली पिली,व त्यांची देखरेख करणारी आई यांच्याकडेच असते.
सुगरण मात्र आपल्या पिलांना त्यांच्या पायात शक्ती, पंखात बळ ,चोचीत ट्रेनव धक्का-धकीच्या जीवनात जगतांना ठेवावयाचे भान शिकवते.आपल्या खोप्याच्या दारात बसुन ही इवलीशी सुगरण आपल्या घरातील राहिलेले जणू अपुरेपण शोधण्याचा प्रयत्न करतांना दिसते.'पिलू निजले खोप्यात,जसा झुलता बंगला ,एका पिलासाठी तिनं जीव झाडाले टांगला'......!या मातृत्वाच्या ओळी पुन्हा-पुन्हा ओठावर रेंगाळल्याशिवाय राहत नाहीत.मातृत्वाची उदार माया हे अंतःकरणात घेऊन पाहतांना जणू या सुगरणीच्या धडपडीचे, तिने अपार मायेने विणलेल्या या कष्टाचे घर व त्या घरातील 'घरपण' नजरेत भरल्यावाचून राहत नाही, हेच खरे ..!!
