तुळजापूर : दास पाटील
इंग्रज राजवटीच्या जोखडातून भारताला १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळूनही मराठवाड्यातील जनतेला स्वातंत्र्याच्या सूर्याची तब्बल १३ महिने वाट पहावी लागली.
शेकडो स्वातंत्र्यसैनिकांच्या प्राणाहुतीनंतर, हजारो देशभक्तांनी निजामाच्या अन्यायी रझाकारी राजवटीच्या विरोधात घरावर तुळशीपत्र ठेऊन सत्याग्रह, आंदोलने यासह सशस्त्र लढा उभारून, प्रसंगी लाठ्या काठ्या खात प्रचंड छळासह तुरुंगवास सोसून दि.१७ सप्टेंबर १९४८ रोजी स्वातंत्र्यसूर्य पाहिला.
मात्र आज या मातृभूमीसाठी प्राणांचे बलीदान करणाऱ्या या वीर स्वातंत्र्ययोध्यांचा निगरगट्ट शासकीय यंत्रणेला विसर पडल्याचे दिसून येत आहे.
निजामाच्या जुलमी राजवटीतून हैदराबाद संस्थान मुक्त करून स्वतंत्र भारतात सामील होण्यासाठी उभारलेल्या लढ्यात तुळजापूर तालुक्याचे योगदान मोठे आहे.
तुळजापूर तालुक्यातील नंदगाव येथील ग्रामस्थांनी निजाम राजवटीच्या विरोधात मोठा लढा उभारला होता. शेकडो देशभक्तांनी रझाकारांना सळो की पळो करून सोडले होते. चिडलेल्या रजाकारांनी नंदगाववर हल्ला चढवून पूर्ण गाव पेटवून देऊन गावाची राखरांगोळी केली. तरीही न डगमगता स्वातंत्र्यसैनिकांनी लढा स्वातंत्र्यप्राप्तीपर्यंत सुरुच ठेवला.
स्वातंत्र्यानंतर जळीतग्रस्त नंदगावातील लोकांना शासनस्तरावर त्याची भरपाई मिळण्यासाठी तब्बल साठ वर्षापेक्षा जास्त काळ वाट पहावी लागली. त्यानंतर जळीतग्रस्तांना दोन लाख रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले. ते एकरकमी न देता टप्प्याटप्प्याने अदा करण्यात आले. त्यातूनही घरपट्टी, नळपट्टी आदी करांच्या कपातीसह आर्थीक गैरव्यवहार होण्याचे प्रकार घडले. त्यासंदर्भात तात्कालीन जिल्हाधिकाऱ्याना जळीतग्रस्तांनी निवेदन देऊन चौकशीची मागणी केली होती.
यावरून शासकीय यंत्रणेसह लोकप्रतिनिधींचा या स्वातंत्र्यवीरांप्रतीचा कृतघ्नपणा आणि कोडगेपणा अधोरेखीत होतो.
तुळजापूर शहरापासून आठ किलोमीटर अंतरावरील अपसिंगा येथेही निजाम राजवट आणि जुलमी रझाकारांच्या विरोधात मोठा सशस्त्र लढा उभारला होता.
या सशस्त्र लढ्यात श्रीधर वर्तक यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. मूळ पश्चिम महाराष्ट्रातील असणाऱ्या आणि मराठवाड्यासाठी बलीदान देणाऱ्या या वीर हुतात्म्याचे पार्थिव जीपला बांधून उस्मानाबाद शहरापर्यंत फरफटत नेऊन रझाकारांनी घोर विटंबना केली होती. त्यांची समाधी आज अपसिंगा गावाबाहेर उन्हातान्हात उभी आहे. शासकीय यंत्रणेचे तिकडे कसलेही लक्ष नाही.
शासनाने हैदराबाद मुक्तीसंग्रामातील हुतात्मे आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या पुण्यस्मरणासाठी अनेक ठिकाणी हुतात्मा स्मारके उभारली. मात्र शासकीय स्तरावरील उदासीनता, अक्षम्य दुर्लक्ष यामुळे त्यांची प्रचंड दुरवस्था झाली आहे.
जुलमी निजाम राजवट आणि रझाकारांच्या अत्याचार संपविण्यासाठी भारत सरकारने हल्ला चढवून हैदराबाद संस्थान भारतात विलीन करण्याचा निर्णय घेतला. यासाठी लष्करी कारवाई करण्यात आली. अॉपरेशन पोलो म्हणून ही कारवाई करण्यात आली असली तरी पोलीस अॅक्शन म्हणून या कारवाईस ओळखले जाते.
तुळजापूर शहर मुक्त करण्यासाठी केलेल्या कारवाईत भारतीय लष्करातील चार जवानांनी आपली प्राणाहुती दिली , असे जुने जाणकार, वृद्ध अजूनही सांगतात.
त्यापैकी दोन समाध्या तुळजापूर शहराच्या पश्चिमेकडे बारालिंग मठ, भारतीबुवा मठ परिसरात ढासळलेल्या अवस्थेत बरीच वर्षे होत्या. त्याकडे प्रशासनाने कथाही लक्ष दिले नाही. सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गातील बाह्यवळण रस्त्याच्या कामात या समाध्या कायम मातीआड गेल्या. आज त्या वीर सैनिकांची नावेही कुणाला ठाऊक नाहीत, ही मोठी शोकांतिका आहे.
तर शहरातील शिवाजी चौकात बलीदान दिलेल्या जमादार हरीराज सिंह आणि जमादार मांगेराम या.दोन जवानांच्या समाध्या बऱ्या अवस्थेत आहेत. पत्र्याच्या शेडमध्ये असलेल्या स्मारकाशेजारी सातत्याने घाण कचरा साठलेला दिसून येतो.
तुळजापूर शहरातही भवानी रोडवरील दीपक चौकाजवळ असलेल्या हुतात्मा स्मारकाचीही अशीच दुरवस्था झालेली दिसून येते. स्मारकाच्या बाजूस नेहमीच घाण, दुर्गंधी आढळून येते. स्वातंत्र्यासाठी प्राणांचे बलीदान देणार्या या वीरांच्या स्मारकांची उपेक्षा खेदजनक आहे.
फक्त दरवर्षी १७ सप्टेंबर हैदराबाद मुक्तीसंग्रामदिनी शासकीय यंत्रणा, नगरपरिषद यांना जाग येते. समाधीवर हार गुलाल अर्पण करून श्रद्धांजलीचा सोपस्कार पार पाडण्यात येतो. मात्र या स्मारकांचा जिर्णोद्धार करून सुशोभिकरण करून हुतात्म्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जात नाही, हे अत्यंत खेदजनक आहे.
तुळजापूर शहर विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर होऊन त्याची पुरती विल्हेवाट लावली गेली. या कामात या वीर हुतात्म्यांच्या स्मारकस्थळाचा जिर्णोद्धार आणि सुशोभिकरण करण्याचा विसर लोकप्रतिनिधी, शासकीय यंत्रणा यांना सोईस्कररित्या पडला, असेच म्हणावे लागते.
हैदराबाद मुक्तीसंग्रामात बलिदान देणाऱ्या या वीरांच्या स्मारकांचे जिर्णोद्धार करून त्यांच्या पवित्र स्मृतींचा उचित सन्मान होणे गरजेचे आहे.
