पुणे : वसंत जाधव

पुणे येथे 17 सप्टेंबर रोजी बालगंधर्व रंगमंदिर, या ठिकाणी "मराठवाडा मुक्तिदिन" महोत्सव आयोजित करण्यात आले असून यावेळी सांस्कृतिक कार्यक्रम व विविध क्षेत्रातील मान्यवरांना मराठवाडा भूषण पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. 

सायंकाळी पाच वाजता बालगंधर्व रंगमंदिरात सांस्कृतिक कार्यक्रम तर सायंकाळी सहा वाजता पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाजकल्याण मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. तस्नीम पटेल तर प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. भास्करराव आव्हाड हे उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी प्रशासकीय पुरस्कार म्हणून यवतमाळ जिल्हयाचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख, नांदेडचे प्रसिध्द सर्पदंश तज्ञ डॉ. दिलीप पुंडे यांना सामाजिक पुरस्कार, उस्मानाबादचे ज्येष्ठ साहित्यिक प्रा. भास्कर चंदनशिव यांना कलासाहित्य पुरस्कार, पुणे विदयापिठाचे तेज निवळीकर यांना शैक्षणिक पुरस्कार, औरंगाबाद येथील संजय टेक्नोप्लास्ट कंपनीचे कार्यकारी संचालक प्रसाद कोकिळ यांना उदयोजक पुरस्कार, उपळा जि. उस्मानाबाद येथील आदर्श शेतकरी मनोज पडवळ यांना कृषी पुरस्कार, कॉमनवेल्थ गेम्समध्ये कुस्तीत सुवर्णपदक विजेता राहुल आवारे यांना क्रिडा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. तसेच विशेष सन्मान म्हणून प्रसिध्द नेत्ररोग तज्ञ डॉ. अनिल दुधभाते, संगीत शिक्षक तालमणी खंडेराय मुळे, समाजसेवक म्हणून उस्मानाबाद जि.प. सदस्य महेंद्र धुरगुडे यांचा गौरव करण्यात येणार आहे.

भारताचा स्वातंत्र्यदिन 15 ऑगस्ट 1947 रोजी साजरा होत असताना "हैद्राबाद संस्थान" निजामशाहीच्या जुलमी जोखडात अडकून पडले होते. मुक्तीलढयातील योध्यांच्या अतुलनीय पराक्रमामुळे व भारताचे गृहमंत्री "सरदार वल्लभभाई पटेल" यांच्या नेतृत्वाखाली पोलीस कारवाईमुळे 17 सप्टेंबर 1948 रोजी हैद्राबाद संस्थानच्या निजामाने शरणांगती पत्करली व स्वतंत्र भारतामध्ये हैद्राबाद संस्थान सामील झाले.

सध्याच्या मराठवाडयातील आठ जिल्हे, ज्यास "मराठवाडा विभाग" म्हणून ओळखले जाते तो भाग, या तत्कालीन हैद्राबाद संस्थानचा घटक होता. हैद्राबाद राज्याच्या स्वातंत्र्यबरोबरच मराठवाडा विभागही शेकडो वर्षाच्या पारतंत्र्यातून मुक्त झाला. कालांतराने त्याचे महाराष्ट्रात विलिनीकरण झाले, तेव्हापासून हैद्राबाद मुक्तिदिन हा मराठवाडा मुक्तिदिन म्हणून ओळखला जातो.

एकसंघ भारताच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची घटना असणाऱ्या या दिनाचे महत्व अधोरेखीत करण्यासाठी, तसेच पुणे व मराठवाडा वासियांमध्ये सुसंवाद साधण्यासाठी, मराठवाडा समन्वय समितीच्या माध्यमातून हा एक राष्ट्रीय  व सामाजिक सलोखा जोपासणारा "मराठवाडा मुक्तिदिन महोत्सव" मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येत आहे.

या कार्यक्रमाचे विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मराठवाड्यातील कर्तृत्ववान व्यक्तींना पुणे व पिंपरी - चिंचवड‍ परिसरातील तमाम मराठवाडावासीय व पुणेकरांच्या वतीने "मराठवाडा भूषण पुरस्कार" देऊन गौरविण्यात येणार आहे.

या कार्यक्रमामध्ये सुरुवातीला सांस्कृतिक कार्यक्रमाच्या मेजवाणी बरोबर विविध क्षेत्रातील तज्ञ मान्यवरांचे विचार ऐकण्याची संधी लाभणार आहे. तरी या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन मराठवाडा समन्वय समिती पुणे चे अध्यक्ष राजकुमार धुरगुडे पाटील यांच्यासह समितीच्या पदाधिका-यांनी केले आहे.

 
Top