काटी : उमाजी गायकवाड
वक्तृत्व कला म्हणजे अभिनिवेश नाही तर लोकांपर्यंत पोहोचण्याचे सहज माध्यम आहे. मराठवाडा मुक्तीदिनानिमित्त पिंपळा खुर्द येथे शालेय वक्तृत्व स्पर्धा संपन्न झाल्या. विजेत्यांना रोख बक्षिसे व शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले .या प्रसंगी सरपंच महादेव जाधव, दादासाहेब कदम ,सोपान कदम ,तानाजी पाटील, पांडुरंग कदम, चैतन्य गिरी, मधुकर धनके ,देवीदास गायकवाड हे मान्यवर उपस्थित होते .शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थ यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम घेण्यात येऊन मुलांना प्रेरणा देण्यासाठी बक्षिसेही देण्यात आली.
मराठवाडा मुक्ती संग्रामाचा इतिहास मुलांना सखोलपणे माहीत असावा, याविषयीचा सविस्तर अभ्यास होऊन त्यांची स्पष्टपणे ओळख व्हावी ,त्याबरोबरच मुलांच्या अभिव्यक्तीसाठी व्यासपीठ उपलब्ध करून देऊन स्पर्धेद्वारे त्यांच्यातील या कलेचा विकास व्हावा यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले .यावेळी शाळेतील तीस विद्यार्थ्यांनी अभ्यासपूर्ण भाषणे सादर केली .त्यात मराठवाड्याचा स्वातंत्र्य संग्रामाचा लढा ,स्वामी रामानंद तीर्थ यांचे लढ्यातील समर्थ नेतृत्व, गोविंदभाई श्रॉफ यांचे योगदान व हैदराबादच्या निजामाच्या जुलमाचा प्रतिकार करण्यासाठी गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांची विशेष कामगिरी याबद्दल सविस्तर विचार मांडले. तसेच स्थानिक लोकांचे सहकार्य लढयातील स्थानिक नेतृत्व ,महिला व जनतेच्या उत्स्फूर्त सहभागाने लढा कसा यशस्वी झाला याची सूत्रबद्ध मांडणी मुलांनी भाषणात करून सर्वांनाच आपल्या या कलेने प्रभावित केले.
लोकांच्या सहकार्याने व सहभागाने विजेत्यांना बक्षिसे दिली . मोठ्या गटात प्रथम क्रमांक श्रद्धा धनके प्रणाली लुंगसे ,द्वितीय क्रमांक स्नेहा कदम ,तृतीय क्रमांक मोहीनी नरवडे हे विजेते ठरले तर लहान गटात प्रथम क्रमांक श्रद्धा गिरी ,द्वितीय क्रमांक दत्तात्रय संजय कदम, तृतीय क्रमांक अंश कदम यांनी बाजी मारली. सर्वांनीच या बाल वक्तृत्व वीरांचे कौतुक करून शुभेच्छाही दिल्या .तसेच जिल्ह्यात मुक्तीदिनानिमित्त मराठवाडा स्वातंत्र्य संग्राम या विषयावर शालेय वक्तृत्व स्पर्धा घेणारी पिंपळा खुर्द ही एकमेव शाळा आहे तर बालवयात स्पर्धेचे व्यासपीठ उपलब्ध करून देणे त्यांना मार्गदर्शन यांनी निश्चितच चांगले वक्तृत्व गुण विकसित होण्यासाठी शाळेने केलेले प्रयत्नाची उपस्थितांनी कौतुक केले. यावेळी सोपान कदम यांनी सर्वांना मार्गदर्शन करून विशिष्ट पद्धतीने लढ्याचा इतिहास कथन केला .तसेच दानशूर ग्रामस्थांचे आभार ही मानले. श्री पांडुरंग कदम यांनी शाळेस दहा खुर्चा देण्याची घोषणा केली .यावेळी परीक्षक म्हणून श्री विठ्ठल नरवडे ,गुणवंत चव्हाण, श्री रोमन सर यांनी काम पाहिले तर शिवाजी वेदपाठक यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले .
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक देविदास गायकवाड, विठ्ठल नरवडे, शिवाजी वेदपाठक, पांडुरंग जावळे, प्रशांत वैदकर, बाळू मुंडे, गुणवंत चव्हाण, मनोज पाटील, माधव मोरे, अंजली निकते, रामलिंग दराडे यांनी विशेष परिश्रम घेतले.

