मुरूम : विठ्ठलसाई कारखान्याची योग्य दिशेने वाटचाल सुरू असून उत्पादन खर्च कमी आहे.कुठल्याही प्रकारचे भेदभाव न करता सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना समान न्याय देण्याचा प्रयत्न करत कारखाना कर्जमुक्त केले आहे.येणाऱ्या काळात अडचणींना तोंड देण्यास कारखाना प्रशासन सक्षम असल्याचे सांगितले.त्याचबरोबर दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर कारखान्याचा गळीत हंगाम सुरू करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन चेअरमन आमदार बसवराज पाटील यांनी केले.

उमरगा तालुक्यातील मुरुम येथील विठ्ठलसाई सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवार (दि 27) रोजी चेअरमन आ बसवराज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.यावेळी व्हा चेअरमन सादिकमियाँ काझी,संचालक बापुरावजी पाटील,शरणाप्पा पत्रिके,माणिक राठोड,शिवमूर्ती भांडेकर,विठ्ठल बदोले आदींची उपस्थिती होती.प्रारंभी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी तसेच अहवाल वर्षात दिवंगत झालेल्या विविध सामाजिक,राजकीय, सरंक्षण क्षेत्रातील मान्यवर त्याचबरोबर कारखान्याचे सभासद यांना आदरांजली वाहण्यात आली.कारखान्याचे कार्यकारी अधिकारी एम बी अथणी यांनी अहवाल वाचन करत मांडलेल्या विषयांना उपस्थित सभासदांनी टाळ्यांचा गजरात मान्यता दिली.

पुढे बोलताना आ पाटील म्हणाले की,अनेक अडचणींना तोंड देत कारखान्याची वाटचाल सुरू आहे.सभासदांच्या जोरावर योग्य नियोजन करून कारखाना कर्जमुक्त केला आहे. निसर्गाच्या लहरीपणावर मात करत ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी पाण्याचे योग्य नियोजन करून चांगल्या प्रतीच्या ऊसाचे उत्पादन घ्यावे.विठ्ठलसाई कारखाना परिसरातील सर्वच ऊसाचे गाळप करण्यात येणार असून सभासदांनी गडबड न करता परिपक्व ऊस गाळपासाठी विठ्ठल साई कारखान्यास देऊन सहकार्य करण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजू पाटील यांनी केले. संचालक विठ्ठल बदोले यांनी आभार मानले.या प्रसंगी कारखान्याचे सर्व संचालक, सभासद,कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top