बार्शी (गणेश गोडसे) :-
बार्शी येथील भोगेश्वरी मंदिराजवळील भाजी मंडीमध्ये भाजीपाला खरेदी करण्यासाठी गेलेल्या सहा जनांचे मोबाईल हॅन्डसेटवर चोरट्यांनी डल्ला मारून 70 हजाराचा ऐवज लंपास केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. एकाच वेळी व एकाच दिवशी सहा लोकांच्या खिशातून मोबाईल लंपास करण्यात आल्यामुळे शहरात नागरिकांमध्ये खळबळ उडाली असुन मोबाईल चोरट्यांचा शोध घेऊन त्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी बार्शीकर जनतेमधुन करण्यात येत आहे.
रमेश रामलिंग ढमढेरे वय 68, रा. शेटे प्लॉट, अलिपूर रोड बार्शी या सेवानिवृत्त पाटबंधारे अधिका-याने मोबाईल चोरीबाबत बार्शी शहर पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास ते भोगेश्वरी मंदिरा जवळील भाजी मंडई येथे भाजी आणण्यासाठी गेले होते. निम्मी अर्धा भाजी घेतल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की वरच्या खिशात मोबाईल नाही. तो कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरला आहे.चोरट्यांनी त्यांच्या दहा हजार रूपये किंमतीचा मोबाईल लंपास केला. दरम्यान त्यांच्या बरोबरच भाजी मंडईत भाजी खरेदी करण्यास आलेले श्रीकांत धोडींबा चव्हाण रा.पाटील चाळ, तुळजापूर रोड बार्शी यांचा दहा हजार रूपये किंमतीचा,अनंत ज्ञानदेव गायकवाड रा. आगळगाव ता. बार्शी यांचा 15 हजार रूपये किंमतीचा,विद्या शाम मांगडे रा. बार्शी यांचा 13 हजार रूपये किंमतीचा ,अजय अरूण दाभाडे रा. ठोंगे उपळाई ता. बार्शी यांचा 1800 रूपयांचा व सुरेश भगवान पाठक रा. ढगे मळा यांचा 16 हजार रूपये किंमतीचा असे 70 हजार रूपये किंमतीचे सहा मोबाईल हॅन्डसेट लंपास करण्यात आल्याचे समजले. दिलेल्या फिर्यादीवरून संमती शिवाय चोरट्यांनी मोबाईल चोरून नेऊन आर्थिक नुकसान केल्याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरूद्ध बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बार्शी बसस्थानकावर 15 हजाराचा मोबाईल लंपास
पुणे येथुन येऊन आपल्या पिंपरी (आर) ता.बार्शी या गावी जाण्यासाठी बार्शी- तुळजापुर बसमध्ये बसत असताना अज्ञात चोरट्यांने आसीम बाबुलाल पठाण वय 23 रा.पुणे यांच्या खिशातून 15 हजाराचा मोबाईल लंपास केला. फिर्यादी पठाण यांच्या दोन्ही हातात पिशव्या असल्याची संधी साधुन अज्ञात चोरट्यांने मोबाईल लंपास केला.याबाबत बार्शी शहर पोलिसात फिर्याद दिली आहे.