तुळजापूर (दास पाटील) :-
वाढती महागाई, पेट्रोल, डिझेल, गॅस या इंधन दरवाढीसह विविध समस्येने सर्वसामान्यांचे जगणे मुश्किल झाले आहे. मे २०१४ नंतर पेट्रोलच्या करात २११% आणि डिझेलच्या करात ४४३ % वाढ केली आहे. केंद्र व राज्य शासनाच्या अवास्तव करवाढीमुळे ही सर्वसामान्यांचे कंबरडे मोडणारी इंधन दरवाढीची समस्या निर्माण झाली आहे. भाजप सरकार सर्वच क्षेत्रात अपयशी ठरल्याचा आरोप करत काँग्रेस पक्षाने देशव्यापी बंदची हाक दिली होती. या बंदमध्ये समविचारी पक्षांनी सहभागी होण्याचे आवाहन काँग्रेस पक्षाकडून करण्यात आले होते. त्या आवाहनाला प्रतिसाद देत महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शेतकरी कामगार पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, पिपल्स रिपब्लिकन पार्टी या बंद आंदोलनात सहभागी झाले.
मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन तीन पदाधिकारी, कार्यकर्ते वगळता राष्ट्रवादीने या बंदकडे पाठ फिरवल्याचे दिसून आले.
सकाळी १०.३० च्या सुमारास काँग्रेस, मनसे पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी शहरातील बाजारपेठेत फिरून व्यापार्यांना बंदचे आवाहन केले. त्यानंतर शहरातील बाजारपेठ बंद ठेवण्यात आली. तसेच कार्यकर्त्यांनी बसस्थानकात जाऊन राज्य परिवहन बस वाहतूक सेवा रोखून धरली. यामुळे कसलाही अनुचित प्रकार घडून एस.टी. चे नुकसान टाळण्यासाठी एस. टी. प्रशासनाने बस वाहतूक थांबवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे बसस्थानकात बाहेरगावावरून आलेल्या अनेक बसेस थांबून होत्या. यामुळे प्रवाशांचे मात्र हाल झाले.
छत्रपती सिवाजी महाराज पुतळ्यापासून शहरात रॅली काढण्यात आली. भवानी रोड, मंदीर महाद्वार, आर्य चौक,कमानवेस, मंगळवार पेठ या मार्गाने रॅली काढण्यात आली. या रॅलीत सरकारविरोधी घोषणा देण्यात आल्या. रॅलीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शे.का. पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते. रॅलीनंतर नायब तहसीलदार भारती यांना निवेदन देण्यात आले.
या बंदमध्ये काँग्रेस तालुकाध्यक्ष अमर मगर, जि.प. सदस्य धीरज पाटील, पं.स. सभापती शिवाजी गायकवाड, नगरसेवक सचिन पाटील, सुनील रोचकरी, सज्जनराव साळुंके, माऊली भोसले, मनसेचे माजी जिल्हाध्यक्ष अमरराजे परमेश्वर, धर्मराज सावंत, प्रमोद परमेश्वर, वेदकुमार पेंदे, शे. का. पक्षाचे प्रकाशराव देशमुख, किरण खपले, उत्तम अमृतराव, राहुल खपले, अंगद सलगर, राष्ट्रवादी काँग्रेसचे बाळासाहेब शिंदे, भालचंद्र मगर, काँग्रेसचे भारत कदम, रणजीत इंगळे साहेबराव जाधव, लखन पेंदे, शांताराम पेंदे, श्रीकांत धुमाळ, कुमार वाघमारे, दत्ता मस्के, राजाभाऊ शेंडगे, करण साळुंके, शंकर कोरे, बशीर शेख, युसुफ शेख आदी पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दुपारी १ च्या नंतर बाजारपेठ हळूहळू सुरु झाली. तसेच दुपारनंतर एस.टी. सेवा पूर्ववत सुरळीत झाली. दरम्यान कसलाही अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलीस उपअधीक्षक संदीप घुगे आणि पोलीस निरीक्षक राजेंद्र बोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
विदयार्थी काँग्रेसच्यावतीने सर्व सहकार्यानी मिळून उस्मानाबाद जिल्ह्य़ातील सर्व काॅलेज, शाळा, महाविद्यालय, कोंचिग क्लासेस बंद करून भाजपा सरकारचा निषेध करण्यात आला.
व्हिडिओ पहा -
विदयार्थी काँग्रेसच्यावतीने सर्व सहकार्यानी मिळून उस्मानाबाद जिल्ह्य़ातील सर्व काॅलेज, शाळा, महाविद्यालय, कोंचिग क्लासेस बंद करून भाजपा सरकारचा निषेध करण्यात आला.
व्हिडिओ पहा -