तुळजापूर : कुमार नाईकवाडी
येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत पीक कर्जाचे वाटप अत्यंत संथगतीने सुरु असून यामुळे गरजू शेतकऱ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. तसेच बँकेत दलालांचा सुळसुळाट झाला असून सर्वसामान्य शेतकऱ्यांची दलालांच्या माध्यमातून लूट होत आहे. सर्वसामान्य, गोरगरीब शेतकऱ्यांची अडवणूक करून त्रास देणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर त्वरीत कारवाई करून पीककर्जाचे वाटप सुरळीत करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेच्या वतीने तहसीलदार, तुळजापूर यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, जाचक नियम, अटी लावून पीककर्जासाठी आलेल्या गोरगरीब शेतकऱ्यांना वाटेला लावले जात आहे. पीककर्ज मंजुरीचे काम अत्यंत संथगतीने सुरु आहे. अटींची पूर्तता करणाऱ्या शेतकऱ्यांना मनुष्यबळ उपलब्ध नाही, यासह विविध थातूरमातूर कारणे देत बोळवण केली जात आहे. विचारणा करणार्या शेतकऱ्यांना संबंधित अधिकाऱ्यांकडून अपमानास्पद वागणूक दिली जात आहे. बँकेत दलालांचा सुळसुळाट झाला आहे. अडलेल्या शेतकऱ्यांच्या गरजेचा फायदा घेऊन काम करून देण्यासाठी दलाल प्रत्येक फाईलसाठी दोन ते तीन हजाराची मागणी करत आहेत.
यंदा अत्यल्प पावसामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. उत्पादित शेतमालाला भाव नाही. सर्व बाजूने कोंडीत सापडलेल्या शेतकऱ्यांची बँकेकडून नाहक अडवणूक होत आहे. त्यामुळे शेतकरी वर्गास मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. तरी संबंधित अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करून सर्वसामान्य, गोरगरिब शेतकऱ्यांची पिळवणूक थांबवून त्वरीत पीककर्ज वाटप करण्यात यावे, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
या निवेदनावर मयूर गाढवे, महेश जाधव, रोहीत दळवी, अक्षय साळवे, आकाश पवार, सागर जगताप, समीर शेख, राहुल गायकवाड, ऋषी माने, शिवाजी झाडपिडे, भागवत तिघाडे, मुकुंद देवारे, महेश देवारे, दयानंद माळी, संतराम करंडे, शेखर स्वामी, दिपक कोनाळे, सोमनाथ भोरे, नागनाथ वडवे, रोहीत सुतकर आदींच्या स्वाक्षर्या आहेत.
