नळदुर्ग : विविध योजनेचा लाभ घेण्यासाठी जेष्ठ नागरिकांसह अपंग असलेल्या लाभार्थ्यांना वयाचे प्रमाणपत्र देण्यासाठी तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य अधिकारी, कर्मचारी विनाकारण आडकाठी करणा-या व हुज्जत घालणा-या संबंधित कर्मचा-यांविरुध्द कारवाईच्या मागणीसाठी शिरगापूर ता. तुळजापूर ग्रामपंचायती सरपंच व उपसरपंचानी जिल्हाधिका-यांकडे लेखी तक्रार केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, दि. 25 सप्टेंबर रोजी मौजे शिरगापूर येथील सरपंच अंकुश कदम व उपसरपंच सौ. अश्विनी जाधव यांचे पती विनायक जाधव हे वृद्ध, निराधार व अपंग अशा 32 लोकांना घेवून श्रावण बाळ व संजय गांधी निराधार योजेनेच्या पेन्शन साठी वयाचे दाखला घेण्यासाठी तुळजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात गेले असता यावेळी वैदयकीय अधिका-यांनी वयाच्या प्रमाणपत्रावर सही करून दिले व नवीन इमारतीमध्ये जावून शिक्का घेण्यास सांगितले. त्याप्रमाणे आम्ही गेलो असता सदरील ऑफीस बंद असल्याचे आढळून आले. अधिक चौकशी केली असता कर्मचाऱ्यांनी सांगितले की ऑफिस साडे चार वाजता चालू होईल. तो पर्यंत आम्ही सर्वजण रुग्णालयात थांबून रितसर फीस भरली. त्यानंतर साडे चार वाजता प्रमाणपत्रावर शिक्का घेण्यास गेलो असता त्यांना विचारणा केली की, आम्ही साडे बारा वाजल्यापासून वाट पाहत थांबलोय. तेंव्हा संबंधित आरोग्य अधिकारी व कर्मचा-यांनी हे काम आमचं नाही, आम्ही करतो हेच उपकार समजा, मदत करत आहे, सहानभुती पोटी करून देतो हेच उपकार समाजा, असे अरेरावीची भाषून बोलुन आमची तक्रार कुठे करायची आहे तिथे करा, असे सांगून आम्ही काय रिकामे नाहीत, असे बोलून वाद घातले.
दरम्यान, आठवड्यातील एक दिवस सदरील प्रमाणपत्रा देण्यासाठी ठरविण्यात आले आहे. तुळजापूर तालुक्यातुन नागरीक येतात. एक दिवस प्रमाणपत्र देण्याचा दिवस असूनसुद्धा सदरील आरोग्य कर्मचारी साडे बारा वाजताच कामकाज बंद करीत असल्यामुळे नाहकच जेष्ठ, निराधार, अपंग व्यक्तींना किरकोळ कामासाठी दिवसभर रुग्णालयात मनस्ताप सहन करत थांबावे लागते. याबाबत शिरगापूर ता. तुळजापूर ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच यांनी संबंधितांना लेखी तक्रार देवून सुरळीतपणे प्रमाणपत्र देण्याची मागणी करुन संबंधित आरोग्य अधिकारी व कर्मचा-याची चौकशी करुन दोषींविरुध्द कारवाई मागणी करण्यात आली आहे. या निवेदनाची प्रत जिल्हा आरोग्य अधिकारी, तुळजापूर तहसिलदार यांना देण्यात आले आहे.
