कळंब :
तालुक्यातील येरमाळा येथील संभाजीनगर गणेश मंडळाने गणेशोत्सवात अनावश्यक खर्चाला फाटा देवून आणि देणगी स्वरुपात रोख रक्कमेऐवजी अन्नधान्य गोळा करुन गुरुवार रोजी महाप्रसादाचे वाटप केले. या स्नेहभोजन महाप्रसादाचा ग्रामस्थांसह पंच क्रोशीतील तीन हजार गणेशभक्तांनी लाभ घेतला. संभाजीनगर गणेश मंडळाच्या या उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे.
येरमाळा ता. कळंब येथील संभाजीनगर गणेश मंडळाच्या वतीने गेल्या 7 वर्षांपासून गणेशोत्सव साजरा करीत असून दरवर्षी वेगळे उपक्रम साजरे केले आहे. प्रामुख्याने शिस्तबद्ध मिरवणुक, जहांज पथक,तलवार पथक, ढोल पथक,लेझीम पथक तसेच सामाजिक विषयावरील पथनाट्य, मिरवणुकीतून सादर करणे अशा उपक्रमातून लक्ष वेधून घेतले होते. गणेशोत्सवात रांगोळी,निबंध,नृत्य, भाषणे,वादविवाद आदी स्पर्धांचे आयोजन असे विविध उपक्रम सात वर्षाच्या काळात सादर केले आहेत. या वर्षी संभाजीनगर गणेश मंडळाच्या सर्व सदस्यांनी रोख वर्गणी गोळा ना करता स्नेहभोजन महाप्रसादाचा उपक्रम राबवण्या संकल्प करुन स्वयंपाकासाठी लागणारे साहित्य देणागिस्वरुपात गोळा केले.गुरुवारी स्नेहभोजन महाप्रसादाचे आयोजन केले.स्नेहभोजन महाप्रसादाचा लाभ ग्रामस्थांनी घ्यावा असे चार डिजिटल फलक गावातील मुख्य चौकात गणेश स्थापने दिवशीच लावले होते. त्या मुळे ग्रामस्थांसह, परिसरातील गावाच्या लोकांनी स्नेह भोजन महाप्रसादाचा मोठया प्रमाणात लाभ घेतला.गुरुवारी दु.४ ते रात्री १० या वेळेत सुमारे तीन हजार ग्रामस्थानीं स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला.रात्री ११:३० वाजे पर्यंत महाप्रसाद स्नेहभोजन सुरु होते. रोख वर्गणी गोळा ना करता स्नेहभोजनासाठी लागणारे साहित्य जमवून यंदा गणपतीची मिरवणूक ना काढता,स्नेहभोजनाचा उपक्रम यशस्वीपणे राबविल्याने संभाजीनगर गणेश मंडळाचे अभिनंदन केले जात आहे.
